नागपूर : वंचित बहुजन आघाडीतर्फे शनिवारी धंतोली येथील टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजातील बुद्धिजीवी लोकांचे कान टोचले. ते म्हणाले, आर्थिक प्रश्न आणि आंबेडकरवादी यांचा ३६ चा आकडा राहिला आहे. आपल्यात खोगीर आंबेडकरवादी आहेत, ज्यांना ना धड आंबेडकरवाद कळला, ना धड क्रांती कळली. आपण आपली मानसिकताच कधी बदलली नाही. नोकरींच्याच मागे धावत राहिलो. आपण नेहमी सुरक्षित आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. इतक्या वर्षात आपण आपले बँकिंग सेक्टर उभे करू शकलो नाही. असुरक्षिता निर्माण झाली आहे ही बाब खरी आहे, त्याचे स्वागत करा. ती वाईट आहे; पण ती जाणवू तर द्या. ही असुरक्षितताच माणसाला काही करायला बाध्य करते, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपण आंबेडकरी चळवळ आणि क्रांती आपण खऱ्या अर्थाने समजूनच घेतली नाही. आपण केवळ जातीने आंबेडकरवादी झालो. विचारांनी आंबेडकरवादी झालो असतो, तर आज कुणासमोर हात पसरण्याची वेळच आली नसती. त्यामुळे जातीने आंबेडकरवादी होण्यापेक्षा विचारांनी आंबेडकरवादी व्हा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
जात व्यवस्थेशी लढण्यासाठी अर्थशास्त्र ताब्यात घ्या
जात व्यवस्थेशी लढण्यासाठी अर्थशास्त्र ताब्यात हवे, आताचे युग हे अर्थशास्त्राशी जुळले आहे. जात व्यवस्थेशी लढायचं असेल, तर अर्थशास्त्र आपल्या ताब्यात असणे आवश्यक आहे. भावनिकतेपेक्षा तर्क हे सर्वात मोठे लढाईचे शस्त्र राहणार आहे. तर्काच राजकारण करीत राहू, तर ही अर्थव्यवस्था टिकून राहू शकते. महाराष्ट्राचाच विचार केला, तर बौद्ध आंबेडकरी लोक खरेदीवर तब्बल १० लाख कोटी रुपये खर्च करतात. यातून सरकारला मिळणारा टॅक्स १७ ते १८ टक्के आहे. आता ही अर्थव्यवस्था आपल्यातच फिरवली तर मोठी क्रांती होऊ शकते, असे प्रतिपाद वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.