ॲड. प्रकाश आंबेडकर : आम्ही दोषी होऊ इच्छित नाही. आमचा मताचा अधिकार आम्हाला शाबूत ठेवायचा आहे
मुंबई : आज दुपारी १२ वाजता राजगृह, दादर (पूर्व), मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज होणाऱ्या मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी चर्चा केली. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभारावर तीव्र टीका केली. आणि मतदारांच्या नावांमध्ये होणारी वगळणी, एसआयआर प्रक्रिया आणि फॉर्म सहासंदर्भातील प्रश्न उपस्थित केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी कारभार चालवलेला आहे. त्यांना जे दोन सहकारी आहेत, त्या दोन सहकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात अनेक पत्रे एकत्र काम केले पाहिजे. मुख्य निवडणूक आयुक्ताने घेतलेल्या स्वतंत्र निर्णयांच्या संदर्भातही त्यांनी वक्तव्य केले. महाराष्ट्राचे चीफ इलेक्टोरल ऑफिसर चोकलिंग यांनी चीफ इलेक्शन कमिशनला पत्र लिहून एसआयआर आणि फॉर्म सहा योग्य नसल्याचे सांगितले असून, यासंदर्भात नव्याने मार्गदर्शन करण्याची मागणी केली.
या प्रकरणातील सर्वात मोठा जबाबदार घटक भारताचे सरन्यायाधीश असल्याचा आरोप त्यांनी केला. जजमेंट देताना संसदेच्या अधिकारांवर मर्यादा आणण्यात आल्याचे ते म्हणाले. संसदेने निवडणूक आयोगाला दरवर्षी इलेक्टोरल रोल रिव्हाइज करण्याचा अधिकार दिला असून, जानेवारी महिन्यात ही प्रक्रिया पार पाडली पाहिजे, असे कायद्याच्या माध्यमातून सांगितले आहे. तसेच, एखाद्या मतदारसंघात किंवा मतदारसंघाच्या एखाद्या भागात तक्रार प्राप्त झाल्यास विशेष पुनर्निरीक्षणाचे अधिकार निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत.
“मी ‘कल्प्रिट’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे,” असे सांगत निवडणूक आयोगाने संसदेने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला. मतदारसंघ किंवा मतदारसंघाच्या एखाद्या भागापुरते मर्यादित असलेले अधिकार संपूर्ण राज्यात एसआयआर राबवण्यासाठी वापरण्यात आल्याचे ते म्हणाले. भारताच्या सरन्यायाधीशांनी संसदेचे अधिकार वापरून १९५० च्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमधील कलमाचा आवाका वाढवून निवडणूक आयोगाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्ताला पदावरून हटवण्याचे अधिकारही संसदेकडे असल्याचे सांगून, हे प्रकरण निकालात काढण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्ग अवलंबले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन येथे निदर्शने करून आंदोलन आणि पक्षाच्या मागण्या जिवंत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले. लोकांमध्ये राग आणि चीड असल्याचे सांगत, हा राग वाढल्यास परिस्थिती शासनाच्या हाताबाहेर जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. चुकीच्या गोष्टी घडवून आणणाऱ्यांना आधीच थांबवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रातून अडीच कोटी मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता असल्याचे वंचित बहुजन आघाडीने आधीच सांगितले होते, आता अडीच ते सव्वादोन कोटी नावे वगळली जाणार असल्याची परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. अनेक व्यक्तींना मृत दाखवण्यात आले; मात्र त्या जिवंत असून, ते निवडणूक आयोगासमोर येऊन त्यांची नावे पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मतदारयादीतून नाव वगळल्यानंतर ते पुन्हा समाविष्ट करण्यासाठी फॉर्म सहा भरण्यास सांगितले जात असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. फॉर्म सहा हा नव्याने मतदार होणाऱ्या, वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या व्यक्तींसाठी असल्याचे ते म्हणाले. या फॉर्ममध्ये यापूर्वी मतदान केलेले नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. मात्र, आधी मतदान केलेल्या आणि आता मतदारयादीतून नाव वगळलेल्या व्यक्तींनी असे प्रतिज्ञापत्र दिल्यास त्यांच्यावर सात वर्षांच्या कारावासाची कारवाई होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे चुकीमुळे नागरिकांना गुन्हेगार ठरवले जाण्याची शक्यता असल्याचा आरोप करत त्यांनी हा गंभीर मुद्दा असल्याचे सांगितले. वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेमुळे संबंधित मतदार अडचणीत येऊ शकतात आणि त्यांच्या विरोधकांना त्याचा फायदा मिळू शकतो, असेही ते म्हणाले.
“आम्ही गुन्हेगार होऊ इच्छित नाही. आमचा मताचा अधिकार आम्हाला शाबूत ठेवायचा आहे,” असे सांगत त्यांनी मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आणि या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावेळी इतरांना सोबत येण्याचे आवाहन केले होते; मात्र कोणीही पुढे आले नाही, असे त्यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरे कोणीही लढत नसल्याचे सांगत, याचिका फेटाळण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. “त्यावेळेस जर सगळे आमच्याबरोबर आले असते, तर ही परिस्थिती आताच्या टप्प्यापर्यंत आली नसती,” असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.






