मुंबई : SNDT महिला विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयाकडून मनमानी शुल्क आकारणी करून विद्यार्थ्यांचा आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक छळ केला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीसंदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिष्टमंडळाने आज विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलग दोन दिवसांपासून विद्यापीठ प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी केला.
आजही कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिव हे तिन्ही जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्याने शिष्टमंडळाची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर संतप्त झालेल्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी केल्या जात असताना प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका सम्यक विद्यार्थी आंदोलनाने घेतली आहे. मनमानी शुल्क आकारणी आणि विद्यार्थ्यांचा होत असलेला छळ याबाबत विद्यापीठ प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
या प्रकरणी लवकरच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शिष्टमंडळ संबंधित उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहे.
या आंदोलनात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रशांत बोराडे, मोहित दामोदर, राहुल अहिरे, भूषण पाईकराव, अभय सोनकांबळे आणि भूषण वानखेडे सहभागी झाले होते.





