रेणापूर : रेणापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून, सिंचनासाठीचा पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाने परिसरातील रोहित्रांचा वीजपुरवठाही खंडित केला आहे. असे असतानाही, पानगाव येथील पन्नगेश्वर शुगर मिल्स लिमिटेड या साखर कारखान्याचा प्रकल्पातून पाणीउपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. यंदा प्रकल्प परिसरात अपुऱ्या पावसामुळे धरणात केवळ २०.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, रेणापूर, पानगाव, खरोळ्यासह परिसरातील अनेक गावे आणि बीड जिल्ह्यातील काही गावांच्या पाणीपुरवठा योजना या प्रकल्पावर अवलंबून आहेत.
प्रशासनाने अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी चार पथके नियुक्त करून काही शेतकऱ्यांच्या मोटारी, वायर आणि स्टार्टर जप्त केले आहेत. मात्र, शेतकऱ्यांवर कडक कारवाई होत असताना साखर कारखान्याच्या पाणीउपशाबाबत प्रशासन कोणती भूमिका घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे रेणापूर तालुकाध्यक्ष रतन आचार्य यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन कारखान्याचा पाणीउपसा बंद करण्याची मागणी केली होती. यावर पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी, कारखान्याने परवानगी मागितल्याचे आणि महसूल विभागाचे आदेश प्राप्त झाल्यास पाणीउपसा बंद करण्यात येईल असे स्पष्ट केल्याचे सांगितले.
दरम्यान, तहसीलदार प्रशांत थोरात यांनी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भरारी पथकप्रमुख तथा पानगावच्या मंडळ अधिकाऱ्यांना कार्यवाही करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात कोणती कारवाई झाली व पाणीउपसा बंद झाला का, याबाबत स्पष्टता नाही. विशेष म्हणजे, हा कारखाना भाजपच्या केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्याशी संबंधित असून अक्षय मुंदडा हे त्याचे चेअरमन आहेत.
त्यामुळे सत्ताधारी पक्षाशी संबंधित कारखान्याला अभय दिले जात आहे का, असा राजकीय प्रश्नही वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. यासंदर्भात तहसीलदार प्रशांत थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती देण्याचे म्हटले आहे. पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने निष्पक्ष कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.






