श्रीरामपूर : वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यादरम्यान श्रीरामपूर येथे विविध कार्यक्रमांना भेटी देत त्यांनी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते तसेच विविध समाजघटकांशी संवाद साधला.
श्रीरामपूर येथील लुंबिनी बुद्ध विहाराला सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला.
त्यानंतर हरेगाव येथील संत तेरेजा चर्चलाही सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. ख्रिस्ती हक्क परिषदेसाठी ते प्रमुख उपस्थित म्हणून सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी ख्रिस्ती बांधवांशी संवाद साधला. यावेळी ख्रिस्ती समुदायातील तरुण तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा आणि तालुका कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी संघटनात्मक कामकाज, स्थानिक पातळीवरील पक्षबांधणी तसेच ख्रिस्ती हक्क परिषदेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यासोबतच आदिवासी समाजातील नागरिकांसोबतही सुजात आंबेडकर यांनी संवाद बैठक घेतली. विविध समाजघटकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी संवाद साधत स्थानिक परिस्थितीची माहिती जाणून घेतली. श्रीरामपूर दौऱ्यातील या विविध भेटी आणि बैठकांमुळे वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक संघटनात्मक उपक्रमांना चालना मिळाल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.





