वंचित बहुजन महिला आघाडी व समता सैनिक दलाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
भंडारा : नवेगाव (धु.), पोस्ट कांदरी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा येथे समता सैनिक दलाच्या शाखेच्या फलकाची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा निषेध करत वंचित बहुजन महिला आघाडी, भंडारा आणि समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हाधिकारी सावन कुमार तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूर हसन यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणातील दोषी व्यक्तींना तातडीने शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नवेगाव (धु.) येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी समता सैनिक दलाची शाखा स्थापन करण्यात आली होती. शाखेच्या फलकाचे उद्घाटनही करण्यात आले होते. मात्र, १ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी शाखेच्या फलकावर शेण फेकून ‘समता सैनिक दल’ या नावाची जाणीवपूर्वक विटंबना केल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरातील सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडण्याची शक्यता असून, अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती तसेच इतर पुराव्यांच्या आधारे या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनातील प्रमुख मागण्या
– घटनेची तातडीने चौकशी करण्यात यावी.
– दोषी व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.
– सीसीटीव्ही फुटेज व उपलब्ध इतर पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात यावा.
– दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
– परिसरातील सामाजिक शांतता व सलोखा कायम ठेवण्यासाठी आवश्यक पोलीस सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात.
या घटनेची तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई न झाल्यास समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना वंचित बहुजन महिला आघाडी, भंडारा जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे, परमानंद मेश्राम, सचिन गेडाम, अमित नागदेवे, यादोवराव गणवीर, गणेश गजभिये, कुंदा ऊके, गीता चौहान, जयपाल गडपायले, धनराज कोडवते, रूपचंद खंडाते, विलास नागदेवे, सी. डी. गवरे, बबिता राऊत, प्रतिमा बन्सोड, संगीता वासनिक, विशाखा गडपायले, शिला मेश्राम, पल्लवी बन्सोड, कारंजा मेश्राम, अनिता मेश्राम, अनुराधा मेश्राम, शारदा मेश्राम, प्रणिता शेंडे, मंदाबाई मेश्राम, पवित्रा बन्सोड, लता मेश्राम, सदानंद रंगारी, महेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते.
या प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी, भंडारा यांच्यासह पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन आंधळगाव यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली. घटनेची तातडीने दखल घेऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.





