पुणे : COEP Technological University मधील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक अडचणीबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, विद्यापीठाने एकूण पाच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी Registration करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रियेतील अडचणीमुळे शैक्षणिक वर्ष धोक्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
३ ऑगस्टला COEP Technological University मधील Second Year B.Tech Metallurgy शाखेचा विद्यार्थी परम अजय शाह याने LLC विषयाच्या backlog च्या manual registration प्रक्रियेत आलेली अडचण सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे किरण दिलीप सैंदाणे यांच्याकडे मांडली होती. संबंधित प्रक्रियेनुसार प्रयत्न करूनही विषयाची नोंद वेळेत होऊ न शकल्याने त्याचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
विद्यार्थ्याची समस्या समजून घेतल्यानंतर किरण सैंदाणे यांनी हा प्रश्न सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून विद्यापीठ प्रशासनासमोर मांडला. “प्रशासकीय प्रक्रियेमुळे विद्यार्थ्याचे एक वर्ष वाया जाता कामा नये,” अशी भूमिका घेत विद्यार्थ्याला न्याय्य संधी मिळावी आणि त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
या पाठपुराव्यानंतर दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी COEP Technological University कडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकानुसार एकूण पाच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी Registration करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे एका विद्यार्थ्याने मांडलेल्या प्रश्नाला न्याय मिळण्यासोबतच अन्य चार विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक पुढील वाटचालीची संधी मिळाली आहे.
याबाबत बोलताना किरण दिलीप सैंदाणे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केवळ सोशल मीडियावर आवाज उठवणे पुरेसे नाही. विद्यार्थ्यांची समस्या प्रशासनाच्या टेबलवर घेऊन जाणे, त्यांची बाजू ठामपणे मांडणे आणि प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करणे, हीच सम्यक विद्यार्थी आंदोलनाची भूमिका आहे.






