मुंबई : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या वतीने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर (पूर्व), मुंबई येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत संस्थेच्या आगामी कार्याची दिशा, संघटनात्मक विस्तार तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अधिक व्यापक करण्याबरोबरच धम्मप्रसार, सामाजिक प्रबोधन, पर्यटन विकास, संघटन विस्तार आणि समता सैनिक दलाची ताकद वाढविण्यासंदर्भात यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
या विशेष बैठकीस भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार उपस्थित होते. बैठकीला एकूण सुमारे २५० ते ३०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
संघटनेचे कार्य राज्याच्या कानाकोपऱ्यात अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, धम्मप्रसार व सामाजिक प्रबोधनाला गती देणे आणि समता सैनिक दलाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीत झालेल्या चर्चेतून आगामी काळातील संघटनात्मक व सामाजिक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला.





