मनमाड: मनमाड नगरपरिषदेच्या मालकीच्या सार्वजनिक जागेवर बेकायदेशीरपणे खाजगी टर्फ उभारणीस परवानगी दिल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास अशोक अहिरे यांनी मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.
तसेच संबंधित ठराव तात्काळ रद्द करण्याची आणि टर्फच्या उद्घाटनास तीव्र विरोध करण्याची भूमिका जाहीर केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मनमाड नगरपरिषदेने एका बेकायदेशीर ठरावाद्वारे राजमाता जिजाऊ क्रीडाभूमी किंवा जलतरण तलाव परिसरासारख्या सार्वजनिक जागेचा वापर खाजगी टर्फ उभारणीसाठी दिला आहे.
ही जागा शहरातील सामान्य नागरिकांच्या खेळासाठी व मनोरंजनासाठी राखीव असताना, कोणताही सार्वजनिक लिलाव किंवा पारदर्शक प्रक्रिया न राबवता अशा प्रकारे खाजगी हितासाठी देणे अत्यंत चुकीचे व बेकायदेशीर आहे. त्यामुळे नगरपरिषदेने हा ठराव तात्काळ रद्द करून सार्वजनिक जागेचा ताबा पुन्हा मिळवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या खाजगी टर्फचा उद्घाटन समारंभ शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला असून, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक या उद्घाटनाला प्रत्यक्ष विरोध दर्शवणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास संपूर्णपणे नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही विलास अहिरे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती नाशिकचे जिल्हाधिकारी, मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व प्रसारमाध्यमांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.






