औरंगाबाद : पैठण शहरातील रेणुका अपार्टमेंटजवळ मातंग समाजातील १७ वर्षीय अनमोल देविदास अहिरे याची २ जून २०२६ रोजी सायंकाळी किरकोळ कारणावरून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी खुनासह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ तसेच अन्य संबंधित कलमांनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली आहे.
या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी पातोडे यांनी पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असे आश्वासन दिले.
यानंतर बुधवारी (दि. १९) सायंकाळी ६ वाजता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मयत अनमोल अहिरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांचे सांत्वन करून न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन देण्यात आले.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पैठण तालुका अध्यक्ष सोमनाथ निकाळजे, जिल्हा सदस्य भगवानराव बनसोडे, शहर महासचिव दत्ता पाटील वाहुळे तसेच मयत अनमोल अहिरे यांची आई अनुसया अहिरे आणि रवी अहिरे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.





