२४ तोळ्यांचे चांदीचे कडे परत करून जपली माणुसकी; प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर
हिंगोली : समाजात स्वार्थ, फसवणूक आणि गैरप्रकारांचा सुळसुळाट होत असताना प्रामाणिकपणा, माणुसकी आणि नैतिक मूल्यांचा आदर्श आपल्या कृतीतून जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव होणे अत्यंत गरजेचे आहे. याच भावनेतून शिरडशहापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयात व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चिंचोली दराडे (जिंतूर) येथील शेतकरी प्रताप पुंजाजी दराडे यांच्या तुरीच्या पोत्यात चुकून राहिलेले २४ तोळ्यांचे, अंदाजे ७० हजार रुपये किमतीचे चांदीचे कडे शिरडशहापूर येथे आल्यानंतर व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांच्या निदर्शनास आले. मौल्यवान चांदीचे कडे सापडल्यानंतरही त्यावर कोणताही मोह न धरता त्यांनी शेतकरी प्रताप दराडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर स्वतः चिंचोली दराडे येथे जाऊन गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत चांदीचे कडे त्यांच्या मूळ मालकाला परत केले.
मोहम्मद अखीम यांच्या या प्रामाणिक कृतीची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी समाजरत्न अनिल कांबळे यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत, अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी कृतींचा समाजाने आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी बोलताना अनिल कांबळे म्हणाले, “आज समाजात वाईट प्रवृत्तींचा सुळसुळाट असताना एखाद्या व्यक्तीने सापडलेली २४ तोळ्यांची मौल्यवान वस्तू कोणताही मोह न ठेवता मूळ मालकाला परत करणे ही निश्चितच मोठी गोष्ट आहे. अशा प्रामाणिकपणाचा सन्मान करणे आणि त्याचा आदर्श समाजासमोर ठेवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.”
“माणुसकीला धर्म नसतो आणि प्रामाणिकपणाला जात नसते. मुस्लिम समाजाबद्दल राजकीय स्वरूपात निर्माण केल्या जाणाऱ्या गैरसमज आणि नकारात्मक भावनांना मोहम्मद अखीम यांनी आपल्या प्रामाणिक कृतीतून छेद दिला आहे. समाजात बंधुभाव, विश्वास आणि सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी अशा उदाहरणांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे,” असेही कांबळे यांनी सांगितले. “मोहम्मद अखीम हे माझ्या गावातील व्यापारी आहेत, याचा मला मनापासून अभिमान आहे. त्यांच्या प्रामाणिक कृतीमुळे शिरडशहापूर गावाची मान उंचावली आहे,” अशी भावना अनिल कांबळे यांनी व्यक्त केली.
या सत्कार कार्यक्रमास आनंद ढेंबरे, यश राठोड, हनीफ पठाण, मौलाना शहादत, शेख कादिर, शेख अख्तर, शाकीर पठाण, महादू सूर्यतळ, विलास सुपनर, शेख अशपाक, संतोष गव्हरकर, समीर पठाण, यशवंत कांबळे आदी उपस्थित होते. प्रामाणिकपणाचा सन्मान झाला, तर प्रामाणिकपणाला बळ मिळते; आणि अशा कृतींचा आदर्श पुढे आला, तर समाजात माणुसकी अधिक दृढ होते, असा संदेश या सत्कारातून देण्यात आला.





