प्रस्ताव जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप; गटनेते इंजि. प्रशांत इंगोले यांचा सभागृहाच्या पायरीवर ठिय्या
नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी मांडलेले प्रस्ताव जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. सभागृहातील एकतर्फी कारभाराचा निषेध करत नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीचे गटनेते इंजि. प्रशांत इंगोले यांनी सभागृहाच्या पायरीवर बसून निषेध नोंदवला. यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही या निषेधात सहभाग घेतला.
महानगरपालिकेच्या सभागृहात सर्व नगरसेवकांना समान संधी देऊन त्यांच्या प्रस्तावांवर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी मांडलेल्या प्रस्तावांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याने हा प्रकार लोकशाही मूल्यांना बाधक असल्याची भूमिका आंदोलक नगरसेवकांनी मांडली.
यावेळी नांदेडकरांच्या विविध प्रश्नांसाठी, नागरिकांच्या हक्कांसाठी आणि शहराच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडी यापुढेही सभागृहात ठामपणे आवाज उठवत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता, समान वागणूक आणि सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी केली.






