नांदेड : नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलालगतची संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी, नांदेड दक्षिणच्या वतीने आज ‘काम बंद आंदोलन’ करण्यात आले.
युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी संबंधित बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले का, तसेच कामात निष्काळजीपणा झाला का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी या प्रकरणातील चौकशी अहवाल शिष्टमंडळाला दाखविण्यात येईल आणि आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बांधकामांच्या गुणवत्तेची प्रभावी तपासणी करण्याची मागणी केली.





