पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी रश्मिता पोपेटा या भगिनींनी (दि. २८ जून) सुरू केलेल्या आमरण उपोषणाला वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगराच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा पत्र सुपूर्द केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी शेतकरी, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी दिलेले योगदान अतुलनीय असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देणे ही जनतेची दीर्घकालीन आणि रास्त मागणी आहे. या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पक्षाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, महासचिव अविनाश अडागळे, महासचिव संतोष मुजमुले, उपाध्यक्ष कविता वाघमारे, संघटक भालचंद्र शिंदे, शंकुतला जाधव, विष्णू प्रधाने, सचिव विजय घोबाळे, सदस्य नारायण माळी, सचिन गायकवाड, पनवेल तालुका उपाध्यक्ष नितीन कांबळे, पनवेल तालुका कोषाध्यक्ष निवेदन देठे, सिद्धेश दाभाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दि. बा. पाटील यांना न्याय मिळावा आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा, अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.



