अकोला : अकोला शहरातील वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विद्यमान वीजमीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत संदेश पाठविण्यात येत असून, नागरिकांना पुरेशी माहिती न देता आणि विश्वासात न घेता ही प्रक्रिया राबविली जात असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश देव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्मार्ट तंत्रज्ञानाला विरोध नसला तरी नागरिकांच्या हक्कांवर अतिक्रमण करून, पारदर्शकता न ठेवता आणि उत्तरदायित्व टाळून कोणताही निर्णय अकोलेकरांवर लादला जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच नागरिकांना विश्वासात न घेता मीटर बदलण्याचे काम सुरू राहिल्यास वंचित बहुजन आघाडी जनतेसोबत लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला. निलेश देव यांनी सांगितले की, स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (Akola Smart Meter)
Also Read : नंदुरबारमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसंवाद मेळावा; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापित पक्षांवर हल्लाबोल
मीटर बदलण्याचा आधार काय, भविष्यातील वीजबिलांची गणना कशी होणार, वेळेनुसार दर (ToD) लागू होणार का, मीटरमध्ये त्रुटी आढळल्यास जबाबदार कोण, तसेच बिल वाढल्यास तक्रार कुठे करायची, अशा अनेक शंकांची उत्तरे नागरिकांना मिळालेली नाहीत. महावितरणने या प्रश्नांची स्पष्ट माहिती देण्याऐवजी केवळ सहकार्याची अपेक्षा व्यक्त करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरणकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या.
Also Read : विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीची चौकशी करा; निवडणूक निरीक्षकांकडे प्रशांत इंगोले यांचे निवेदन
प्रत्येक ग्राहकाला मीटर बदलण्याचे कारण लेखी स्वरूपात देण्यात यावे, मीटर बसविणाऱ्या अधिकृत कर्मचारी व कंत्राटदारांची माहिती जाहीर करावी, जुना व नवीन मीटर रीडिंगची लेखी नोंद ग्राहकाला द्यावी, स्मार्ट मीटरमुळे बिलिंग प्रक्रियेत होणाऱ्या बदलांबाबत जनजागृती करावी, तक्रारींसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा आणि कोणत्याही ग्राहकाकडून थेट किंवा अप्रत्यक्ष आर्थिक आकारणी केली जाणार नाही याची हमी द्यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. “वीज ही नागरिकांना मिळणारी मूलभूत सुविधा आहे, उपकार नव्हेत. त्यामुळे अकोलेकरांना माहिती, पारदर्शकता आणि न्याय मिळालाच पाहिजे,” असे निलेश देव यांनी स्पष्ट केले. (Akola Smart Meter)
सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट
नांदेड : सोनखेड येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे का, अशी विचारणा केल्यानंतर झालेल्या बाचाबाचीत सादेख अली यांचा दुर्दैवी मृत्यू...
Read moreDetails






