Norway Chess 2026 : भारताचा युवा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंद याने नॉर्वे चेस 2026 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. प्रतिष्ठेच्या या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
अवघ्या 20 वर्षांच्या प्रज्ञानंदने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम फेरीपूर्वी तो 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, विजेतेपदासाठी निर्णायक ठरलेल्या अखेरच्या सामन्यात त्याने जर्मनीच्या विन्सेंट केमरवर मात करत 3 महत्त्वाचे गुण मिळवले. या विजयामुळे त्याचे एकूण गुण 18 झाले आणि त्याने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
विशेष म्हणजे, स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात प्रज्ञानंदने सलग चार सामने जिंकत जबरदस्त पुनरागमन केले. दबावाच्या परिस्थितीतही त्याने दाखवलेली शांतता, अचूक डावपेच आणि रणनीती यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
या स्पर्धेतील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे प्रज्ञानंदने जगातील अव्वल बुद्धिबळपटू आणि पाच वेळचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याला दोन वेळा पराभूत केले. एका स्पर्धेत कार्लसनवर दोन विजय मिळवणारा तो विश्वनाथन आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी आनंद यांनी 2007 मध्ये लिनारेस स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.



