– संजीव चांदोरकर
काल माझा एक उच्च/ किंवा उच्च मध्यम वर्गातील म्हणा…..एक मित्र गंभीरपणे म्हणाला परीक्षा पद्धतीतील गोंधळ, फिया, अगदी बेरोजगारी या प्रश्नांवर विद्यार्थी, तरुणांनी आंदोलने करणे एकवेळ समजू शकते
पण ही जेन झी अगदी गाभ्यातील राजकीय प्रश्नांवर …. निवडणूक प्रणाली…. आर्थिक भ्रष्टाचार…. या इश्यूंवर एवढी मोठी आंदोलने करत आहेत हे काही बरोबर नाही. अनेक जण तर शहरी मध्यमवर्गातील दिसत आहेत. विशेषतः मुली.
त्यांनी अभ्यास, कौशल्ये आत्मसात करणे, एआय किंवा तत्सम काय येऊ घातले आहे…ते समजून त्यासाठी स्वतःला तयार करणे यावर लक्ष दिले पाहिजे. राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते राजकीय इश्यू बघून घेतील की
मी म्हणालो की यार तू आयुष्यात एवढी बऱ्यापैकी माया कमावली आहेस की आता सत्तेवर कोण येते, कोणते कायदे पास होतात, त्याचे नक्की परिणाम काय…याने तुझ्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही. तू स्वतःला इन्स्युलेट केले आहेस. फाईन.
पण तू देशातील जास्तीत जास्त एक टक्का नागरिक, कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतोस.
तरुणांना, विद्यार्थ्यांना पुढची किमान ५० वर्षे या देशात जगायचे आहे. त्यांना त्यांच्या परीने कळून चुकले आहे की त्यांच्या पुढच्या आयुष्याची गुणवत्ता येथील राजकीय, आर्थिक, सामाजिक धोरणांवर निर्णयकपणे ठरणार आहे.
हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? ज्या व्यक्ती सर्वात शिक्षित, बुद्धिमान असतात, ज्या सर्वात प्रमाणिक/ नीतिवान असतात असा काही निकष मुळात अस्तित्वात नाही.
जे कोणी निवडून येतात त्यांना कायदे आणि धोरणे ठरवण्याचा अधिकार मिळतो. पूर्ण शासन यंत्रणा कशी वापरायची हे देखील नोकरशाही, पोलिस नाही ठरवत तर हेच निवडून आलेले लोक त्या गोष्टी प्रभावित करतात. त्या सर्वांमध्ये क्विड प्रो को असतो हे आता जेन अल्फाला देखील कळले आहे एव्हढे खुलेपणाने चालते.
सहाजिकच प्रश्न असा विचारावयास हवा की हे मुळात निवडून कसे जातात? जे दाखवले जाते तसे जर नसेल, भलतेच काही होत असेल तर त्या निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रश्न कोणाच्याही मनात येणारच ना?
विद्यार्थी, तरुणांना दूषित पाणी प्यायला लागत आहे. त्यांना हे कळले आहे की पाण्याच्या प्रवाहात मधेच काहीतरी गडबड होते म्हणून पाणी दूषित होत नाहीये. तर नदीच्या उगमापाशी गडबड आहे.
विद्यार्थी, तरुणांच्या पूर्ण आयुष्याचे स्टेक राजकीय व्यवस्थेशी आहेत म्हणून ते रस्त्यावर उतरले आहेत.
आणि एक
तू म्हणालास यांनी शिक्षण, कौशल्ये यावर लक्ष दिले पाहिजे. प्रमाणिक असलास तर वेळ काढून आंदोलनाच्या ठिकाणी जा. किंवा इतरत्र माहिती घे. या रस्त्यावर उतरणाऱ्या मुला मुलींच्या डिग्री, मास्टर्स, पी एच डी.. आणि त्यांचे diverse professions…यांची माहिती घेतलीस ना…तर त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त ज्ञान शाखा आणि प्रोफेशन्स तुला कळणार देखील नाहीत.
तू आणि तुझ्यासारखे राजकारणापासून दूर राहू इच्छिता ही काही तुम्ही दावा करता ताशी…तुमची वैचारिक भूमिका नाहीये…you can afford to be apolitical.
परदेशात गेल्यावर आमच्या देशात लोकशाही आहे हे तू मिरवतोस की नाही? देशातील लोकशाही प्रणाली जिवंत ठेवण्याचे मोठे काम ही विद्यार्थी, तरुणांची पिढी करत आहे याबद्दल तू त्यांचा ऋणी रहा.






