नांदेड : तालुक्यातील मौजे पुयडवाडी येथे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी नोंद असलेल्या जागेवर ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्र उभारण्याच्या निर्णयाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने गावकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालात संबंधित जागेची नोंद स्मशानवाट आणि स्मशानभूमी म्हणून करण्यात आली आहे. तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालातही ही जागा स्मशानभूमीसाठी असून गावालगत असल्याने येथे ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्र उभारणे योग्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीनेही उपकेंद्रासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव केला आहे. मात्र, त्यानंतरही याच जागेवर उपकेंद्र उभारण्याचा निर्णय झाल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयाला विरोध करताना महिला आणि पुरुष समाजबांधवांवर पोलिसी बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून गावकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
गावकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी कायम त्यांच्या सोबत होती, आजही आहे आणि पुढेही ठामपणे सोबत राहील, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर गं. महाजन यांनी पुयडवाडी येथील समाजबांधवांना दिला. यावेळी जिल्हा महासचिव रवि पंडीत, महानगर महासचिव अमृत नरगंलकर, विजय भंडारे यांच्यासह पुयडवाडी येथील समाजबांधव उपस्थित होते.






