मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ मे २०२६ रोजी जाहीर केलेल्या नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. Commerce Specific असलेल्या गट ‘अ’, गट ‘ब’ तसेच गट ‘क’ संवर्गातील Audit, Accounting, Taxation आणि Finance संबंधित पदांसाठी इतर शाखांतील उमेदवारांनाही पात्र करण्यात येत असल्याने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी याला अन्यायकारक निर्णय म्हटले आहे.
Accounting, Auditing, Taxation, Finance, Costing आणि Financial Management यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांकडेच असते. B.Com., M.Com., CA, CMA, CS यांसारखे अभ्यासक्रम पूर्ण करून हजारो विद्यार्थी अनेक वर्षे या क्षेत्रातील शासकीय सेवेसाठी तयारी करत असतात. दरवर्षी जवळपास ४० ते ५० हजार विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना इतर शाखांतील उमेदवारांना समान पात्रता देणे म्हणजे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांनी शासनाकडे ‘लेखा व लेखापरीक्षण’ हा स्वतंत्र संवर्ग तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच Commerce Specific पदांसाठी पूर्वीप्रमाणेच ‘वाणिज्य शाखेतील पदवी’ हीच शैक्षणिक पात्रता कायम ठेवावी, स्वतंत्र Cut-Off लागू करावा आणि गट ‘क’ मधील Audit, Accounting, Taxation, Finance संबंधित पदांसाठी स्वतंत्र संवर्ग निर्माण करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनीच का अन्याय सहन करायचा?” असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांनी शासनाने या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.



