औरंगाबाद : कांचनवाडी येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भव्य स्वरूपात साजरी करण्यात यावी तसेच विद्यापीठ परिसरात डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने कुलगुरूंना निवेदन देऊन करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे देश-विदेशात मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते, मात्र विद्यापीठात केवळ औपचारिक पद्धतीने फोटोला हार अर्पण करून जयंती साजरी करणे पुरेसे नसल्याचे नमूद केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि माजी कायदेमंत्री म्हणून डॉ. आंबेडकर यांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या जयंतीनिमित्त व्यापक उपक्रम राबवण्याची गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
जयंतीनिमित्त विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, निबंध स्पर्धा, वाचन स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करावे, तसेच १४ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांद्वारे जयंती उत्सव साजरा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यासोबतच विद्यापीठ परिसरात डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची आणि कार्याची सातत्याने प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या निवेदनावर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अक्रम खान, सामाजिक कार्यकर्ते अमरदिप हिवराळे, विकास रोडे, राहुल वाहूळ, अमोल घुगे, अक्षदा शिर्के आदींच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.






