आयआयटी सारख्या ख्यातनाम इन्स्टिट्यूट मध्ये संविधान विरोधी आणि मानवी मूल्यांची पायमल्ली करणारा प्रकार उघडकीस आला. वारंवार असे अनेक प्रकार घडत असताना या प्रकाराने आयआयटीचा काळा चेहरा समोर आला आहे. आयआयटीच्या 1000 हुन अधिक माजी विद्यार्थ्यांनी आयआयटी खडकपूरचे संचालक व्ही के तिवारी यांना एक खुले पत्र लिहिले आहे. प्रा. सीमा सिंग यांनी त्यांच्या ऑनलाईन वर्गात अनुसूचित जाती जमाती तसेच अपंग विदयार्थ्यांबद्धल अनुचित उदगार काढून अपमानास्पद वागणूक दिल्याचे उघडकीस आले होते. सदर पत्रात आम्ही सर्व विद्यार्थी या प्रकारचा जाहीर निषेध करून तात्काळ या प्राध्यापिकेला बडतर्फ करण्याची मागणी करत आहोत, अशी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संचालक म्हणून आपण सुद्धा या बद्धल बिनशर्त माफी मागावी अशी मागणी करत आहोत.
विशेष म्हणजे सीमा सिंग या ‘ह्युम्यानीटी आणि सोशल सायन्स विभागाच्या असोसिएट प्राध्यापिका आहेत. ऑनलाईन शिकवत असतानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे, त्यामध्ये त्या अत्यंत अभद्र भाषेचा वापर करताना त्या दिसत आहेत. विद्यार्थ्यांना उद्देशून त्या म्हणतात, “मी कोणालाही घाबरत नाही, एससी/ एसटी मायनॉरीटी मंत्रालयाला तक्रार केली तरी सुद्धा.” पुढे इंग्रजीत अत्यंत अश्लाघ्य शब्दात पालक आणि विद्यार्थ्यांना ब्ल.. बा… सारख्या शिव्या देताना दिसत आहेत.
या पत्रात अजून एक धक्कादायक आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे, त्यात असे नमूद केले आहे की आयआयटी ही नेहमी दलित, अदिवासी आणि मगासवर्गीय विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. तसेच या प्राध्यापिकेच्या वागण्यातून त्यांच्या सरंजामी वृत्तीचा अंदाज येतो. मनुवादी विचाराने ग्रासलेल्या लोकांना देशातील एक प्रीमियम इन्स्टिट्यूट मध्ये शिकवण्याचा कसलाही नैतिक अधिकार उरत नाही.