– शांताराम पंदेरे
मध्यवर्ती कार्यकारिणी, युक्रांद, महाराष्ट्र मागून पुढे…
पैकी दोन महत्वाचे निर्णय….
१) गावठाण जमीन सर्व आदिवासी-दलितांचे नांवे ७/१२ च्या इतर हक्कात घालण्याचा कार्यक्रम १ ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे. तोपर्यंत या जमिनींच्या कोणत्याही व्यवहारांच्या वेळी संघर्ष समिती व संबंधित आदिवासी-दलितांना विश्वासात घेतले जाईल.
२) धनाजी शेठने आदिवासी स्त्रियांवर चालविलेल्या अत्याचारांची चौकशी येत्या १५ दिवसांत पूर्ण करणार व त्याच्या बंदूका जप्त करून परवाना रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन तहसिलदार, सिनी. फौजदार व सर्कल इन्स्पेक्टर यांनी दिले.
हे निर्णय बाहेर जमलेल्या समूहाला सांगून १५ दिवसांत जर याविषयी पावले उचलली गेली नाहीत तर संघर्ष समिती स्वत:च्या ताकदीवर या गुंडगिरीला तोंड देईल असा इशाराही यावेळी देण्यात आला होता. ही सर्व बोलणी व सभा सावध झालेल्या धनाजी शेठ व त्याच्या माणसांनी ऐकली होती. मात्र त्याची कल्पना संघर्ष समिती आणि युक्रांद च्या कार्यकर्त्यांना नव्हती. धनाजी शेठ मात्र यामुळे चिडला होता.
सभेनंतर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक तळ्याजवळ रात्री १०.३० पर्यंत चालली. मग कार्यकर्ते आपापल्या घरी निघाले. मधु मोहिते, शांताराम पंदेरे आणि इतर सहकारी जेवायला घरी बसले. इतक्यात धनाजी शेठ जीपमधून आला. बंदूका रोखून लोखंडी गज व चाकूने मधु व शांताराम यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सोबत नत्थु पवार व नारायण पवार यांनाही मार लागला. बाकी कार्यकर्ते पोलीस ठाणे व वस्तीवर धावत गेले. दरम्यान मधु व शांतारामवर धनाजीने गोळीबार केला. त्यात मधुवर उजव्या पायाच्या नळीला गोळी लागली. मधु त्याचा स्वत:चा आणि शांतारामचाही मार स्वत:च्या अंगावर घ्यायचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव व सततच्या माराने मधु बेशुध्द पडला. मधु व शांताराम दोघांना प्रचंड मारहाण चालली असतानाच कातकरी-आदिवासी समाजातील गुरूजींच्या टेकडीवरील घरातील दिवा व बत्ती फोडून टाकण्यात आली. सुमारे बारा मिनीटानंतर जेव्हा गावातील लोक धावत आले, तेव्हा त्यांच्यावर धनाजीच्या साथीदाराने गोळीबार केला. आणि सर्वजण जीपमधून सुसाट वेगाने पळून गेले.
त्यानंतर सुमारे १५ मिनीटांनी जवळच असलेल्या पोलीस ठाण्यातील पोलीस जीपने आले. जखमी मधु, शांताराम, नत्थु, आदिंना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. सय्यद यांनी औषधोपचार केले. मधुचे डोके, पाठ, पाय आणि डोळ्याच्या जरा खाली जखमांना टाके घातले होते. डॉक्टरांच्या सांगण्यावरून पोलीस ॲम्बुलन्समधून सायन हॉस्पीटलमध्ये मधुला पहाटे दाखल करण्यात आले. शांताराम व इतर जखमी इलाज झाल्यावर डॉक्टर व पोलीसांना विनंती करून खवळलेल्या लोकांना शांत करण्यासाठी खालापूरलाच थांबले. त्यानंतर शांतारामचा जवाब घेवून पोलीसांनी फिर्याद नोंदवून घेतली.
रात्री घटनास्थळाजवळ तीन काडतूसे व सहा वायसर सापडले. ते पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.
या घटनेच्यावेळी काही संशयास्पद प्रकार घडले आहेत.
– स्वत: सिनी. फौजदार यावेळी स्वत:च्या घरी खोपोलीला (६ कि.मी.) धार्मिक कामासाठी गेले होते. त्यामुळे ही घटना घडली तेव्हा ते तेथे हजर नव्हते.
– हल्ला होण्यापूर्वी आरोपींची जीप पोलीस ठाण्याला लागून असलेल्या रस्त्यावरून घटनास्थळमार्गे १.५ कि.मी. वरील वणवे गावात जावून परत आली. आणि हल्ला केला होता. हल्ल्यानंतरही जीप पोलीसठाण्यावरूनच गेली. त्यावेळी सर्व पोलीस झोपले होते.
– वणवे गावची दोन प्रमुख माणसे हल्ल्यापूर्वी व नंतर घटनास्थळाजवळ सायकल व लूनाने फिरत होती. ते दोघे धनाजीशेठचे जवळचे दोस्त आहेत.
– हल्ला चालू असताना गावातील लाईट्स गेले होते!
– हल्ला झाल्यानंतर पोलीस ठाण्यातील फोन बंद पडला व त्याची वायर तुटलेली होती.
– धनाजी शेठ व आरोपी फरार असल्याचे पोलीस सांगताहेत. परंतु धनाजी पनवेल परिसरात त्याचे व्यवहार करीत आहे.
हल्ल्यानंतरची आदिवासी-दलितांमधील संतापाची लाट
रातोरात जवळच्या गावांतून ही हल्ल्याची बातमी वा-यासारखी पसरली. १४ ला
पहाटेपर्यंत संतप्त कातकरी-आदिवासी, दलित शेकडो स्त्रि-पुरूष खालापूरला येत गेले. हल्ला आणि आमच्या तब्बेतीबाबत चौकशी करत होते. गुंड धनाजी शेठ आणि पोलीसांविरोधात प्रचंड संतापाची लाट आल्याचे जाणवत होते. रागाच्या भरात जमलेला प्रचंड जमाव जुना पुणे-मुंबई हायवे रोखतील. कुणाही बिगर आदिवासी माणसांना मारहाण करतील. गाड्या फोडतील. त्याचबरोबर पोलीस ठाणेही पेटवतील. आदी सारे प्रकार घडतील. हे मी रात्रीच हेरले होते. म्हणून डॉक्टर व पोलीस जखमी मला मधुबरोबर मुंबईला हॉस्पीटमध्ये हलवण्याच्या विचारात होते. त्यांचा प्रयत्न होता, आम्हा कार्यकर्त्यांची ब्याद तेथे लोकांच्या नजरेसमोरून हलवायची होती.
परंतु त्यांचा हा दृष्टिकोण संपूर्ण चुकीचा होता. मधु आणि मी तेथे नाही हे पाहिल्यावर उलट सुलट अफवांना पिक येईल आणि मग अधिक संतापल्या लोकांकडून चुकीचे पाऊल पडले तर एकतर प्रशासनाला रान मोकळे मिळेल आणि मूळ मुद्दा बाजूला पडेल ही मोठी भिती होती. म्हणून मी कसेही करून पोलीस व डॉक्टरांना समजून सांगण्यात यशस्वी झालो आणि खालापूरलाच थांबलो.
मधुला मात्र सायन हॉस्पिटलला ॲडमिट केले. दुस-या दिवशी सकाळपर्यंत प्रचंड संख्येने लोक खालापूरला जमले होते. सोबतचे नत्थु, नारायण, यशवंत, अंबु, सुरेश, बळीराम हे स्थानिक सहकारी आणि मी सर्वांना वास्तव परिस्थिती समजून सांगत होतो. जेणेकरून लोक अधिक भडकणार नाहीत हे पहात होतो. प्राणघातक हल्ल्यातून आपले प्रमुख कार्यकर्ते वाचले हे पाहूनही सर्व जमाव शांत होत होता. ही शेकडो माणसे मात्र १५ एप्रिलपर्यंत सारखी खालापूरलाच आम्हा जखमी कार्यकर्त्यांभोवती बसून होती. या हल्ल्याचा प्रतिकार कसा करायचा याचा विचार करत होती.
दरम्यान पोलीस बंदोबस्त मात्र प्रचंड वाढला होता. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक पोलीस यांनाही आमच्याविषयी अंदाज आला होता. आम्ही थांबल्यामुळेच परिस्थिती अधिक चिघळली नाही याविषयी विश्वास वाटत होता. जिल्हा ठिकाण अलिबागहून पोलीस फौजफाटा खालापूरला आला होता.
त्यातच स्थानिक व मुंबईच्या वर्तमानपत्रांतून आमच्यावरील हल्ल्याच्या बातम्या आल्या होत्या. विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्या, समाजवादी विचारसरणीच्या मृणालताई गोरे यांनी सरकारला प्रश्न विचारले होते. तसेच दिल्लीहून जनता दल नेते खासदार जॉर्ज फर्नांडीस यांनी फोन करून मधुच्या तब्बेतीची चौकशी केली आणि मुंबईतील हिंद मजदूर किसान पंचायतची सारी यंत्रणा कामाला लावली होती. या कामी आमचे युक्रांदचे सहकारी धावपळ करत होते.
या संतापलेल्या लोकभावनेला-वाफेला वाट मोकळी करून देण्याकरिता आगोदरच ठरलेला २१ एप्रिलचा मुंबई-पुणे महामार्गावरील लोधीवली येथे जाहिर सभा आणि रस्ता रोको कार्यक्रम जाहीर करण्यात आला. हिंमकिपंच्या निर्णयानुसार रोजगाराचा हक्क आणि या हल्ल्यासंबंधांतील मागण्यांसाठी हे आंदोलन होते.
तेथे जमलेली माणसेच कार्यकर्ते बनली आणि परतताना वाटेतच सर्वत्र या कार्यक्रमाची बातमी-निरोप देत गेले.
२१ एप्रिलला सगळीकडून झेंडे घेऊन आदिवासी-दलित शेतकरी-शेतमजूर स्त्रि-पुरूष मोठ्या संख्येने सभेला लोधीवलीला महामार्गावर जमले. हजारोंची जाहीर सभा व रस्ता रोको झाला. यावेळी सुमारे ५५० जणांना अटक झाली. त्या सर्वांना अलिबागला नेण्यात आले. त्यानंतर रात्री सर्वांना आपापल्या गावात नेऊन सोडण्यात आले.
या कार्यक्रमात विविध पक्ष-संघटनांनी भाग घेतला होता.
दरम्यान मुंबईत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय रिपब्लीकन पक्षाच्या पुढाकाराने विविध पक्ष-संघटनांची बैठक झाली. यात खालापूर घटनेचा निषेध करण्यात आला. या हल्ल्याची सि.आय.डी. मार्फत स्वतंत्रपणे चौकशी करावी व इतर मागण्यांसाठी २७ एप्रिलला खालापूरला सर्वपक्षीय जाहीर निषेध सभा घेण्याचा निर्णय झाला.
याच काळात मुंबईतील जनता दल महिला आघाडीच्या आमदार मृणालताई गोरे, श्रमिक महिला संघटनेच्या कॉ.अहिल्याताई रांगणेकर, भारतीय महिला फेडरेशनच्या कॉ.मंजू गांधी, नारी अत्याचारविरोधी मंचच्या सोनल शुक्ल, नारी केंद्राच्या निर्मला साठे, समाजवादी महिला सभेच्या कमल गुजर, महिला दक्षता समितीच्या सुधा वर्दे, स्वाधार च्या शैला सातपुते व महिला कार्यकर्त्या छाया दातार, युक्रांच्या रेखा ठाकूर यांनी खालापूरमधील अत्याचारीत महिलांची बैठक घेतली. दि. २५ एप्रिलला सर्वजणी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री नाम. जि.तु.महाजन यांना भेटल्या. या प्रकरणांची चौकशी करून धनाजी शेठला अटक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नंतर या स्त्रियांची वार्ताहर परिषद झाली.
पाठोपाठ २७ एप्रिलला खालापूरला सर्व पक्ष-संघटनांची प्रचंड जाहीर सभा झाली. हजारो आदिवासी, दलित शेतकरी-शेतमजूर मोर्च्याने घोषणा देत सभेला आले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चिटणीस कॉ. प्रभाकर संझगिरी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत भाकपचे कॉ. गोपाळ शेळके, भारिपच्या सरचिटणीस डॉ. निलम गो-हे, व अविनाश महातेकर, हिं.म.कि.पं.चे सरचिटणीस शंकर साळवी, श्रमुद चे तुकाराम कांबळे, भा.द.पॅं.चे मधुकर कांबळे, कोळसा भट्टी कामगार संघटनेच्या निमंत्रक सुरेखा दळवी, भूमिसेनेचे रमेश चौथे, युक्रांद व कोकण लेबर युनियनचे हुसेन दलवाई, सिआरसी. चे सर्जेराव सगर, म्युनि.लेबर युनियन चे प्रभाकर आडेरकर, सर्वहारा महिला संघटनेच्या मंगल खिंवसरा, म.रा.शेतमजूर युनियनचे कॉ. कुमार शिराळकर, युक्रांद महाराष्ट्र चे कार्यवाह शांताराम पंदेरे, सुनिल पाटील, संघर्ष समितीचे नत्थु पवार, आदींची भाषणे या सभेत झाली. त्यानंतर प्रचंड मोर्चा खालापूर तहसिलवर नेण्यात आला. तहसिलदार व पोलीस अधिका-यांशी बोलणी करण्यात आली.
त्यावेळी अधिका-यांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या.
– धनाजी शेठ व त्याच्या गुंडांवर इं.पि.कोड कलम ३०७, १४७, १४८, १४९, ४५०, ५०४, ५०६, व २५ आर्म्स ॲक्ट खटला भरला आहे.
– धनाजी शेठ, व त्याच्या एका साथिदाराने अलिबागहून अटकपूर्व जामीन करून घेतला आहे.
– १५१ खाली धनाजीला अटक करून २५ हजार रुपयांच्या जामीनावर त्याला सोडून दिले आहे. दर रविवारी व बुधवारी त्याला पोलीस ठाण्यावर हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे.
– धनाजीकडे बंदूकीचा परवाना नसून वापरलेल्या बंदूका व जीप अजून सापडलेली नाही.
– अटकपूर्व जामीन रद्द व्हावा म्हणून पोलीस उच्च न्यायालयात जाणार आहेत. (अपूर्ण)
(संदर्भ: खालापूरचा खूनी हल्ला व युवक क्रांती दलाची चळवळ, पान क्र. ८ ते १०, प्रकाशक : घोषणा प्रकाशन, मध्यवर्ती कार्यकारिणीकरिता, पुणे-४११००४, देणगी मूल्य..दोन रु. फक्त.






