नाशिक : नाशिकमध्ये सामाजिक आणि राजकीय वर्तुळात परिचित असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्कारासंबंधी गंभीर आरोपांनंतर अटक करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या कारवाईत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने बुधवारी पहाटे कारवाई करून खरात याला अटक केली. त्याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात झडती घेतल्यावर एक पेन ड्राइव्ह जप्त झाला आहे. त्यामध्ये तब्बल ५८ व्हिडिओ सापडले असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. (Nashik Crime News)
खरात याला अटक केल्यानंतर तपासात धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. तसेच आरोपी खरातवर मंत्रतंत्र आणि दैवी शक्तींचा वापर करून अनेक महिलांचा विश्वास मिळवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी खरातची पाद्यपूजा केल्याचा फोटो सार्वजनिक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ही घटना समोर आपल्यानंतर सरकारने प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. चर्चेचा बाब म्हणजे या पथकाचे नेतृत्व तेजस्वी सातपुते यांना दिले आहे. (Nashik Crime News)
रूपाली चाकणकर स्वतःच कॅप्टन अशोक खरात भोंदू बाबाच्या भक्त निघाल्या – उत्कर्षा रूपवते
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. वंचितांच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी या संदर्भात खडक शब्दात ताशेरे ओढले आहे. त्या म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर स्वतःच कॅप्टन अशोक खरात भोंदू बाबाच्या भक्त निघाल्या! त्याच्या मंदिर ट्रस्टमध्ये त्या सदस्या देखील आहेत. (Nashik Crime News)
पुढे त्या म्हणाल्या, एका बाजूला विवाहित मुलींना ‘संविधान’ देण्याची भाषणं ठोकणाऱ्या दुसऱ्या बाजूला श्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या माणसाची भक्ती करत असतील तर याला काय म्हणावं? आपण ज्यांची भक्ती करत आहोत त्यांचे खरे धंदे काय आहेत हे न कळण्याएवढे आपण अज्ञानी असू शकतो का?
महिला आयोगाच्या अध्यक्षा जर अशा लोकांमागे छत्री घेऊन उभ्या असतील, पाय धूवत असतील तर राज्यातील महिलांना न्याय देण्याची भूमिका निष्पक्षपणे त्या पार पाडू शकतील का? महिलांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा? महाराष्ट्राच्या मनात अनेक प्रश्न उभे राहत आहेत. रूपालीताई चाकणकरांनी यावर स्पष्टपणे बोलावे ही अपेक्षा! (Nashik Crime News)
राज्यातले अनेक बडे नेते यांचे भोंदू अशोक खरातचे भक्त असल्याचे समजते आहे. समोर आलेल्या फोटोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर दिसताय. राजकीय नेत्यांनी त्यावर देखील स्पष्टीकरण देणे तेवढेच गरजेचे आहे. (Nashik Crime News)
खरात याचे धागेदोरे आता राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाच्या तपासात केवळ राजकीयच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील बड्या व्यक्तींचे कनेक्शन समोर येत असल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून यात आणखी कोणाकोणाची नावे निष्पन्न होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






