बुलढाणा : वंचित बहुजन आघाडी, शेगाव तालुक्याच्या वतीने विविध सामाजिक व मूलभूत प्रश्नांबाबत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
पर्यावरण विभागाच्या शासन निर्णयानुसार सण व उत्सव साजरे करण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी केवळ रात्री 10 वाजेपर्यंतच मर्यादा घालण्यात येत असल्याचे आघाडीने नमूद केले. येत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उत्सव रात्री 12 वाजेपर्यंत साजरा करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच राज्यभरात भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना मिरवणुकीसाठीचे मार्ग मोकळे ठेवावेत व कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, त्या ठिकाणी तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
हे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले. तालुका अध्यक्ष प्रविण विरघट यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
यावेळी ॲड. अनिल इखारे (जिल्हा महासचिव), कैलास दाभाडे, प्रमोद गव्हादे (तालुका सचिव), मनोज दहिवाल (ग्रामपंचायत सदस्य, शिरजगाव निळे), संजय धुरंधर (सामाजिक कार्यकर्ते), मंगल भोजने, सचिन विरघट यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.






