सातारा : दहावी आणि बारावीच्या पेपरफुटीच्या बातम्या अधूनमधून समोर येत असतात. मात्र आता सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. अशा परिस्थितीत सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ही घटना फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. येथे दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याची टीका होत आहे. (Satara Exam Scandal)
या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित शिक्षकांवर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सहावीच्या विद्यार्थिनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
तसेच या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यामध्ये संबंधित शिक्षक विद्यार्थिनींच्या मदतीने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. (Satara Exam Scandal)
दरम्यान, या प्रकरणाबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून शिक्षण विभागाने याची दखल घेतली आहे.
जिल्हास्तरावरील अहवाल कोल्हापूर विभागाला पाठवण्यात आला असून विभागाचे अधिकारी उद्या (ता. १३) शाळेला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणार आहेत. तसेच या बेजबाबदार प्रकाराबाबत संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई होणार का, असा सवालही पालकांकडून उपस्थित केला जात आहे.





