नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या राजकारणात आज एक मोठी बातमी समोर आली आहे. बहुचर्चित ‘मद्य धोरण घोटाळा’ प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची स्थानिक राऊज एव्हेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्याअभावी कोर्टाने दिलेला हा निकाल तपास यंत्रणांसाठी (CBI आणि ED) मोठा चपराक मानला जात आहे.
निकाल सुनावताना कोर्टाने तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोर्टाने स्पष्ट केले की, तपास यंत्रणांनी सादर केलेले पुरावे अपुरे आणि अत्यंत कमकुवत आहेत. कोणत्याही आरोपांवर तेव्हाच विश्वास ठेवता येतो, जेव्हा त्यामागे ठोस आधार असतो. आरोपपत्रात अनेक त्रुटी असून, अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तपास यंत्रणांना देता आलेली नाहीत. (arvind kejriwal)
दरम्यान, कोर्टाच्या निकालामुळे तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक असे मुद्दे आहेत, ज्यावर समाधानकारक उत्तरे मिळाली नाही, अशी टिप्पणी कोर्टाने केली. त्याच आधारावर कोर्टाने केजरीवाल, सिसोदिया यांना दिलासा दिला. तपास यंत्रणा या निकालाला आव्हान देणार आहे. कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून हायकोर्टात आव्हान देण्याचे संकेत सीबीआयने दिले आहेत. (arvind kejriwal)
कोर्टाने सर्वात आधी अबकारी विभागाचे आयुक्त कुलदीप सिंह यांची मुक्तता केली, त्यानंतर सिसोदिया आणि शेवटी अरविंद केजरीवाल यांना दिलासा दिला.
निकाल लागल्यानंतर कोर्टाबाहेर येताच अरविंद केजरीवाल भावूक झाले. माध्यमांशी बोलताना त्यांना ढसाढसा रडू कोसळले. अत्यंत आक्रमक आणि भावनिक होत त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. माझ्याविरोधात कपटी राजकारण रचले गेले. आम आदमी पार्टीला संपवण्याचा हा एक मोठा कट होता. मोदीजींनी सत्तेसाठी असे खेळ खेळू नयेत. अमित शहांच्या षडयंत्रामुळे आमच्या पाच नेत्यांना विनाकारण तुरुंगात सडावे लागले, अशी घणाघाती टीका केजरीवाल यांनी केली. (arvind kejriwal)
नेमकं प्रकरण काय होतं?
हे संपूर्ण प्रकरण २०२२-२३ च्या मद्य धोरणाशी संबंधित होते. सीबीआयने या धोरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पहिला गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने या प्रकरणात पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे सांगत तपास सुरू केला. या प्रकरणात मुख्यमंत्री असतानाच केजरीवालांना अटक करण्यात आली होती, ज्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.






