इस्लामाबाद: पाकिस्तान देशाची राजधानी असलेल्या इस्लामाबादमधील एका उच्चभ्रू वस्तीत शुक्रवारी (जुम्मा) नमाज सुरू असताना भीषण आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्याने संपूर्ण पाकिस्तान हादरले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीषण घटनेत आतापर्यंत ६९ जणांचा मृत्यू झाला असून १६९ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. (Islamabad bomb blast)
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबादमधील एका शिया मशिदीमध्ये नागरिक नमाज पठणासाठी जमले होते. त्याचवेळी इस्लामाबादच्या शिया मस्जिदमध्ये सुसाइड बॉम्बने ब्लास्ट केला. एका २२ वर्षीय तरुणाने आत्मघाती हल्लेखोराला मुख्य हॉलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोराने स्वतःला गेटवरच उडवून दिले. हा स्फोट इतका भीषण होता की मशिदीचा एक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. (Islamabad bomb blast)
प्राथमिक वृत्तानुसार, अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये दिसत आहे की, मस्जिदचा एक भाग पूर्णपणे ढासळला असून चारही बाजूने शरीराचे तुकडे पडले होते. (Islamabad bomb blast)
प्रत्यक्षदर्शीच्या मते, स्फोटानंतर सुमारे ४० मिनिटांपर्यंत कोणतीही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नव्हती. स्थानिक नागरिकांनीच आपल्या खासगी गाड्यांमधून जखमींना रुग्णालयात नेले. घटनेनंतर संपूर्ण इस्लामाबादमध्ये ‘इमर्जन्सी अलर्ट’ जारी करण्यात आला. एकीकडे राजधानीत बॉम्बस्फोट होत असताना, दुसरीकडे बलुचिस्तान प्रांतात बलुच लिबरेशन आर्मी (BLA) आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात भीषण संघर्ष सुरू आहे.






