यवतमाळ : उमरखेड शहरातील पाटील नगर ते सुमेधबोधी बुद्ध विहार या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमरखेड नगर परिषदेवर धडक दिली. या निवेदनाची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी येत्या ७ दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
पाटील नगर ते बुद्ध विहार या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना प्रथम निवेदन देण्यात आले होते. मात्र, पाठपुरावा करूनही मध्ये निवडणुका लागल्याने आचारसंहितेमुळे हे काम रखडले होते.
वारंवार मागणी करूनही काम होत नसल्याने आज जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आक्रमक मागणी करण्यात आली. “जर या रस्त्याचे काम तात्काळ सुरू झाले नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमरखेड नगर परिषदेसमोर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.”
वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी येत्या ७ दिवसांत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू होईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष संबोधी गायकवाड, राजू दाभाडे, तालुका उपाध्यक्ष अमोल कांबळे, सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश कवडे, तालुका संघटक अनाथपिंडक खडसे, दादाराव चौरे, गणेश लोखंडे, धम्मपाल कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






