हैदराबाद : एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसऱ्या बाजूला अफाट माया… तेलंगणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उपजिल्हाधिकारी वेंकट रेड्डी यांच्या घरावर टाकलेल्या धाडीने संपूर्ण महसूल विभागात खळबळ उडाली आहे. छाप्यात समोर आलेले दृश्य पाहून खुद्द तपास अधिकारीही चक्रावून गेले. रेड्डी यांच्याकडे तब्बल ८ कोटी ३० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.
बुधवारी सकाळी एसीबीच्या विशेष पथकाने हनुमाकोंडा येथील उपजिल्हाधिकारी वेंकट रेड्डी यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या एकूण ८ ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये हैदराबादमधील पॉश रॉकी टाऊन कॉलनीचाही समावेश होता.
तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तेचा आकडा मोठा आहे:
– रोख रक्कम: ३० लाख रुपये रोख.
– स्थावर मालमत्ता: ६ कोटी रुपये किमतीचा एक आलिशान विला आणि फार्महाऊस.
– दागिने: मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू.
आतापर्यंत ८ कोटी ३० लाखांहून अधिक मालमत्तेचा खुलासा झाला असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
रेड्डी यांनी २००८ सालापासूनच अवैध संपत्ती जमवण्यास सुरुवात केली होती. २०१६-१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात त्यांनी डल्ला मारल्याचा आरोप आहे. तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी असताना १ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी ६ डिसेंबर रोजी त्यांना अटक झाली होती, त्यानंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.





