पहाटे ४ वाजता छापा, कार्यकर्त्यांना शिवीगाळ
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वॉर्ड क्रमांक १३९ मध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासनाकडून ‘दडपशाही’ केली जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीच वंचितच्या कार्यकर्त्यांना धमकावणे आणि महिला उमेदवाराच्या कार्यालयावर पहाटे छापा टाकल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी २०२६ च्या रात्री वॉर्ड क्रमांक १३९ मध्ये पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना अडवून त्यांना धमकावल्याचा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांशी शारीरिक गैरवर्तन करत शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला आहे. सत्तेचा गैरवापर करून करण्यात आलेल्या या कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण वंचितच्या कार्यकर्त्यांनी केले असून, यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज पहाटे ४ च्या सुमारास पोलिसांनी एका ‘खोट्या’ तक्रारीचा आधार घेत वॉर्ड क्रमांक १३९ मधील वंचित-काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल सोहनी यांच्या कार्यालयावर छापा टाकला. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा छापा टाकला गेला, तेव्हा कार्यालयात महिला कार्यकर्त्या झोपलेल्या होत्या. आचारसंहितेचा भंग झाल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली असली, तरी ही कारवाई पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप स्नेहल सोहनी यांनी केला आहे.
‘सत्ताधाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण’
मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात झालेल्या युतीमुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणूनच यंत्रणेचा वापर करून दलित आणि शोषित समाजातून आलेल्या महिला उमेदवाराचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी वर्चस्ववादी पक्षांकडून होत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
“मी आणि माझे कार्यकर्ते सत्ताधाऱ्यांच्या या घाणेरड्या डावपेचांना घाबरणार नाही किंवा त्यांच्यासमोर झुकणार नाही. अशा दडपशाहीला आम्ही बळी पडणार नाही. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे मतदार मतदानाद्वारे या अन्यायाचे चोख उत्तर देतील.” असे स्नेहल सोहनी म्हणाल्या.
पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
निवडणुकीच्या अवघ्या ४८ तास आधी घडलेल्या या प्रकारामुळे वॉर्ड १३९ मध्ये तणावाचे वातावरण आहे. वंचित बहुजन आघाडीने या दडपशाहीचा तीव्र निषेध केला असून, निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.






