मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चे वारे वेगाने वाहू लागले असून, वॉर्ड क्र. १३९ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वॉर्डातील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल सोहनी यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मैदानात उतरत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सुजात आंबेडकर यांनी या भागात पदयात्रा आणि कॉर्नर सभा घेऊन मतदारांना स्नेहल सोहनी यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

कॉर्नर सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुंबईत सध्या केवळ मराठी भाषेच्या नावावर वाद निर्माण करून सर्वसामान्यांचे खरे प्रश्न बाजूला सारले जात आहेत. भावनिक मुद्द्यांच्या आड मुंबईकरांचे मूलभूत प्रश्न झाकले जात आहेत, ही खेदाची बाब आहे.

विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन
मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचताना सुजात आंबेडकर यांनी शिक्षण आणि आरोग्याच्या मुद्द्यावर भर दिला. मुंबईकरांना अद्यापही शुद्ध पाणी आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच पालिकेच्या शाळा आणि रुग्णालयांचा दर्जा सुधारणे ही काळाची गरज आहे.

मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी मतदारांनी आता बदल घडवून ‘वंचित बहुजन आघाडी’ला एक संधी द्यावी. असे त्यांनी आवाहन केले.

या पदयात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. स्नेहल सोहनी यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि कार्यक्षम उमेदवार रिंगणात असल्याने वॉर्ड १३९ मध्ये युतीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. या पदयात्रेला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






