भारतीय क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीला सुवर्ण झळाळी मिळवून देण्यात मोलाचा वाटा देणारे दिग्गज हॉकीपटू दविंदर सिंह गरचा यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जालंधर येथील राहत्या घरी शनिवारी त्यांची प्राणज्योत मावळली.
अमृतसरमध्ये ७ डिसेंबर १९५२ रोजी दविंदर सिंह यांचा जन्म झाला. त्यांनी १९७९ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले आणि अत्यंत कमी वेळात आपली छाप सोडली. १९८० च्या ऐतिहासिक मॉस्को ऑलिम्पिकमध्ये त्यांनी केवळ ६ सामन्यांत ८ गोल डागत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.
त्यांच्याच धडाकेबाज कामगिरीमुळे भारताने स्पेनला पराभूत करून आठव्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदकावर नाव कोरले होते. दविंदर सिंह गरचा हे केवळ मैदानावरच नव्हे, तर प्रशासकीय सेवेतही तितकेच तत्पर होते. त्यांनी ३० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १९ गोल नोंदवले.
दविंदर सिंह गरचा यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी २०२१ मध्ये ‘ध्यानचंद पुरस्काराने’ गौरविण्यात आले होते. हॉकीच्या मैदानानंतर त्यांनी पोलीस दलातही आपली सेवा दिली. ते पंजाब पोलीस खात्यात पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) पदावरून निवृत्त झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी छातीत वेदना होत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरीही सोडण्यात आले होते, मात्र शनिवारी सकाळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि भारतीय हॉकीचा हा ‘सुवर्ण योद्धा’ काळाच्या पडद्याआड गेला.
दविंदर सिंह यांच्या निधनाने भारतीय हॉकीने एक असा खेळाडू गमावला आहे, ज्याने देशाचा तिरंगा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकवला.






