लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात आरोपींचे पुनर्वसन का?
बदलापूर : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवला होता. त्या अमानुष घटनेतील मुख्य आरोपीचा एन्काऊंटरही झाला. मात्र, आता या प्रकरणाशी थेट संबंधित असलेला सहआरोपी भाजपकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून सत्तेच्या पायऱ्या चढत असल्याने संताप उसळला आहे.
कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत शुक्रवारी पाच स्वीकृत नगरसेवकांची घोषणा झाली. यामध्ये भाजपकडून तुषार आपटे यांची नियुक्ती होताच नागरिक, पालक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव उधळून लावा – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
तुषार आपटे हे ज्या शाळेत चिमुकल्यांवर अत्याचार झाला त्या शैक्षणिक संस्थेचे सचिव होते आणि या प्रकरणातील सहआरोपी आहेत. घटनेनंतर फरार असलेले आपटे ४४ दिवसांनी अटक झाले, मात्र अवघ्या ४८ तासांत जामिनावर सुटले. त्यानंतरही त्यांनी शैक्षणिक संस्थेतील कामकाज सुरू ठेवले.
धक्कादायक बाब म्हणजे, या गंभीर पार्श्वभूमीवरही आपटे भाजपच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय होते आणि प्रचारातही पुढे होते. अखेर त्यांना थेट नगरसेवक पद देण्यात आल्याने नैतिकता, राजकीय जबाबदारी आणि महिलांच्या सुरक्षेवरील सरकारच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






