ठाणे: ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच आता शहरात दहशतीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक ७ (क) मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष नामदेव खरात यांचे बंधू आणि कार्यकर्त्यांच्या रिक्षांवर काल रात्री अज्ञात इसमांनी हल्ला चढवत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष खरात यांच्या प्रचारात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांची वाहने रात्री उभी असताना काही अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
निवडणुकीच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीला मिळणारा वाढता पाठिंबा पाहूनच विरोधकांनी घाबरून हे कृत्य केल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर संतोष खरात यांनी वर्तक नगर पोलीस ठाणे गाठले. आपल्या लोकशाही हक्काचा वापर करत असताना अशा प्रकारे नुकसान करणे चुकीचे असल्याचे सांगत, त्यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली आहे.






