जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून विषमतेच्या आणि अन्यायाच्या साखळदंडातून स्त्रियांना व शोषितांना मुक्त केले होते. याच ऐतिहासिक क्रांतीदिनाचे औचित्य साधून, जालना येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने ‘मनुस्मृती दहन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले आणि हा दिवस ‘स्त्री मुक्ती दिन’ म्हणून साजरा केला.

स्त्री मुक्तीचा ऐतिहासिक दिवसकार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी मनुस्मृती दहनाचे महत्त्व विषद केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हा विषारी ग्रंथ जाळून स्त्रियांना गुलामीतून खऱ्या अर्थाने मुक्त केले. आज स्त्रिया ज्या प्रगतीच्या शिखरावर आहेत, त्याचे मूळ या क्रांतीमध्ये आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
महिला आघाडीचा पुढाकार
जालना वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या प्रसंगी “स्त्री मुक्ती दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा” देत, बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष करण्यात आला.






