नांदेड : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या सक्षम ताटे खून प्रकरणातील संताप आता रस्त्यावर आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींच्या अटकेनंतर आता ‘वर्दी’तील दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सक्षमची प्रेयसी आचल मामीडवार आणि त्याच्या आईने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
नेमकं प्रकरण काय?
२७ नोव्हेंबर रोजी नांदेडच्या जुनागंज भागात सक्षम ताटेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आंतरजातीय प्रेमसंबंधातून आचलच्या वडील आणि भावाने ही हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मुख्य आरोपींना अटक झाली असली तरी, आचलने इतवारा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
आचल ने सांगितल्यानुसार, हत्येच्या दिवशी पोलीस कर्मचारी माही दासरवाड आणि धीरज कोमूलवाड यांनी तिच्या अल्पवयीन भावाला सक्षमची हत्या करण्यासाठी चिथावणी दिली होती. “सक्षम तुझ्या बहिणीला रोज घेऊन फिरतो, आधी त्याला मार आणि मग पोलीस स्टेशनला ये,” असे शब्द या कर्मचाऱ्यांनी वापरल्याचा आरोप आचलने केला आहे.
सक्षम ताटे याच्या दुर्दैवी हत्येनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी पीडित आचल आणि तिच्या कुटुंबाची सांत्वन भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी कुटुंबाला धीर देत आचल ची शैक्षणिक जबाबदारी उचलण्याची सांगितले.
पीडित कुटुंब आणि आचलने यापूर्वी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदने देऊन संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्याने संतापलेल्या दोघींनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील उपस्थित पोलिसांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले.
“जर आजच त्या दोषी पोलिसांवर कारवाई झाली नाही, तर आम्ही पुन्हा जीवन संपवण्याचा प्रयत्न करू,” असा आक्रमक पवित्रा आचल आणि सक्षमच्या आईने घेतला आहे. सक्षम ताटे हत्या प्रकरण हे केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नसून, आता त्यात ‘खाकी’ वर्दीतील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आता या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करून काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





