केज: शासकीय कार्यालयातील उशिरा येणारे कर्मचारी, विनापरवाना गैरहजेरी आणि हजेरी पटावर सही करून पळ काढणाऱ्या प्रवृत्तीविरोधात वंचित बहुजन आघाडीने केज पंचायत समितीत आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी थेट रिक्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून ‘गांधीगिरी’ स्टाईलने प्रशासनाचे लक्ष वेधले.
नेमका प्रकार काय?
केज पंचायत समितीमधील विविध विभागांत कार्यरत असलेले अनेक कर्मचारी वेळेचे पालन करत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. अनेक कर्मचारी सकाळी कार्यालयात येतात, हजेरी रजिस्टरवर सही करतात आणि पुन्हा वैयक्तिक कामासाठी बाहेर निघून जातात, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. यामुळे ग्रामीण भागातून कामासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना रिकाम्या खुर्च्या पाहून ताटकळत राहावे लागते. नागरिकांची होणारी ही मानसिक आणि आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने हे अनोखे आंदोलन केले.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
१) गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आंदोलकांनी खालील मागण्या मांडल्या आहेत:
२) हजेरी पटावरील फेरफार आणि कर्मचाऱ्यांची पळवाट रोखण्यासाठी तात्काळ बायोमेट्रिक प्रणाली लागू करावी.
३) कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि विनापरवाना गायब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई व्हावी.
४) गटविकास अधिकारी (BDO) कार्यालयात कधी उपलब्ध असतील, याचे ‘ड्युटी शेड्युल’ दर्शनी भागातील फलकावर प्रदर्शित करावे.
प्रशासनाला दिला इशारायावेळी बोलताना आंदोलकांनी संताप व्यक्त केला की, “सरकारी पगार घेऊन जनतेची कामे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य माणूस वेठीस धरला जात आहे.”
जर या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन कामकाजात सुधारणा झाली नाही आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत बदल झाला नाही, तर आगामी काळात ‘वंचित’ स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.






