मुंबई : जामखेड नगर परिषद निवडणुकीत यावेळी जे घडलं, ते नेहमीच्या राजकारणापेक्षा पूर्ण वेगळं आहे. निवडणूक म्हटलं की पैसा, ओळखी, घराणेशाही आणि मोठे पक्ष हे ठरलेलंच असतं. पण जामखेडमध्ये ही सगळी गणितं उलटी पडली आणि सामान्य माणसांचा आवाज थेट सभागृहात पोहोचला.
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जामखेड नगर परिषदेत पहिल्यांदाच दोन नगरसेवक निवडून आले. विशेष म्हणजे हे दोघेही कुठल्या मोठ्या घराण्यातले नाहीत, ना त्यांच्याकडे पैसा आहे. हे दोघेही इथल्या मातीशी जोडलेले, रोज संघर्ष करणारे लोक आहेत.
प्रभाग क्रमांक ६ (ब) मधून संगीता रामचंद्र भालेराव नगरसेवक झाल्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते. मोठा खर्च, मोठी यंत्रणा त्यांच्या पाठीशी होती. पण संगीता भालेराव यांच्याकडे फक्त एकच भांडवल होतं, लोकांचा विश्वास.
भालेराव कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. पती रामचंद्र भालेराव वखारीत लाकूड फोडण्याचं काम करतात. घर चालवण्यासाठी मुलांनाही कामं करावी लागतात. अशा परिस्थितीतून आलेल्या संगीता भालेराव यांनी प्रचारात कुठलीही दिखाऊ भाषा केली नाही. “मी तुमच्यासारखीच आहे, तुमच्यातलीच आहे” एवढंच त्या लोकांना सांगत होत्या. १८९५ मतांपैकी जवळपास ५०० मते मिळवत त्यांनी विजय मिळवला.
निवडीनंतर त्या म्हणाल्या की आतापर्यंत घरासाठी, संसारासाठी कष्ट केले, आता पुढची पाच वर्षे जामखेडच्या नागरिकांसाठी काम करणार आहे.
दुसरीकडे, कोल्हाटी समाजातील अॅड. अरुण आबा जाधव यांनीही जामखेडच्या राजकारणात नवा इतिहास घडवला. ज्या समाजाला आजवर फक्त तमाशा, लावणी आणि उपेक्षा मिळाली, त्या समाजातून आलेल्या अरुण आबांनी नगरसेवक होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं.
गेली अनेक वर्षे ते कोल्हाटी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी, हक्कांसाठी काम करत आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, प्रश्न मांडले. आता त्याच प्रश्नांना सभागृहात मांडण्याची संधी त्यांना मिळाली आहे. प्रभाग क्रमांक ६ मधून त्यांनी १८९५ पैकी ७६४ मते घेत दणदणीत विजय मिळवला.
ते म्हणाले की आमच्याकडे पैसा नाही, जातीय राजकारणाचं बळ नाही. पण लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. ही संधी आम्हाला वंचित बहुजन आघाडीमुळे मिळाली.
या सगळ्या निकालाने जामखेडमध्ये एक वेगळाच संदेश गेला आहे. आतापर्यंत ज्यांच्या वाट्याला फक्त अपमान, अन्याय आणि दुर्लक्ष आलं, तेच लोक आज लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात बसणार आहेत. हा बदल फक्त राजकीय नाही, तर सामाजिक आहे.
आज उमेदवारी देताना उमेदवार किती श्रीमंत आहे, हे पाहिलं जातं. पण वंचित बहुजन आघाडीने सामान्य कुटुंबातील महिला आणि भटक्या विमुक्त समाजातील कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचं धाडस दाखवलं. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “सत्ता ही सामान्यांच्या हातात” हा विचार जामखेडमध्ये प्रत्यक्षात उतरलेला दिसतो.
लाखोंचं आमिष आणि कोटींचा खर्च न करता, फक्त लोकांशी थेट संवाद साधून ही निवडणूक जिंकली गेली. जामखेडच्या जनतेने पैसा नाही, तर काम करणाऱ्या माणसाला निवडलं.
आज संपूर्ण महाराष्ट्रात या ‘जामखेड पॅटर्न’ची चर्चा सुरू आहे. सामान्य माणसालाही सत्तेत स्थान मिळू शकतं, हे जामखेडने दाखवून दिलं आहे.





