जामखेडपासून सुरू झालेला कमबॅक, सत्ताधाऱ्यांना अनेक ठिकाणी घाम
मुंबई : लोकसभा निवडणुकीत आपल्या राजकीय ताकदीची जाणीव करून दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आता महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये जोरदार आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या यशाची ठोस सुरुवात अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील जामखेड येथून झाली असून, ॲड. अरुण जाधव आणि संगीता भालेराव यांच्या विजयाने वंचित बहुजन आघाडीच्या ‘कमबॅक’ला अधिकृत प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे. या निकालांनी प्रस्थापित पक्षांचे राजकीय गणित बिघडवत वंचितला राज्याच्या राजकारणातील निर्णायक शक्ती म्हणून पुन्हा अधोरेखित केले आहे.
मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांनी वंचित बहुजन आघाडीच्या वाढत्या प्रभावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असले, तरी निवडणूक निकालानंतर राज्यातील विविध भागांत घरोघरी वंचितचा जल्लोष पाहायला मिळाला. सत्ताधाऱ्यांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांना सुरुंग लावत वंचितने नगराध्यक्षपदांसह मोठ्या संख्येने नगरसेवक पदांवर विजय मिळवला असून, विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात या पक्षाने अपेक्षेपेक्षा मोठी मजल मारली आहे.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजताच वंचित बहुजन आघाडीने अहमदनगर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, कणकवली, अमरावती, अकोला, नांदेड यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये आपली ताकद सिद्ध केली. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषदेत प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची नगराध्यक्षपदी निवड झाली, तर अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे अधिकृत उमेदवार अख्तर खातून यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला. प्राथमिक अंदाजानुसार राज्यभरात सुमारे ७० पेक्षा अधिक नगरसेवक आणि दोन ठिकाणी नगरपरिषद अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले आहेत.
गडचिरोलीमध्ये बाळू टेंभूर्णे यांनी प्रस्थापित पक्षांना धक्का देत ऐतिहासिक विजय मिळवला. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे वैदू या भटक्या विमुक्त जमातीतील दिलीप संतराम देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवत गेल्या पन्नास वर्षांत वैदू समाजाचे पहिले नगरसेवक होण्याचा मान मिळवला आहे. हा विजय समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेची फलश्रुती मानली जात आहे. नागपूरच्या वाडी नगरपरिषदेत भाजप-आरएसएसच्या उमेदवारांना पाडून सुनीता मेश्राम, शितल नंदागवळी आणि राजेश जंगले या तिघांनी विजय मिळवत वंचितचे वर्चस्व प्रस्थापित केले, तर यवतमाळमध्ये डॉ. नीरज वाघमारे आणि रिता वीर यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत यश संपादन केले.
या निकालांवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या विजयाला फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारांचा आणि आरएसएसच्या राजकारणाला विरोध करणाऱ्या मतदारांचा कौल असल्याचे म्हटले. प्रस्थापित माध्यमांनी दुर्लक्ष केले असले तरी जनतेने वंचित बहुजन आघाडीला घराघरात पोहोचवले असून, हा विजय कुणा एका नेत्याचा नसून तळागाळातील कार्यकर्त्यांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच अहोरात्र मेहनत घेणाऱ्या युवा कार्यकर्त्यांमुळेच हे यश शक्य झाले, असेही त्यांनी नमूद केले.
एकूणच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीचे वाढते महत्त्व अधोरेखित केले असून, आगामी काळात बहुजन समाजाच्या प्रश्नांवर आधारित पर्यायी राजकारण अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत या निवडणूक निकालांतून मिळत आहेत.






