मुंबई : पॅरिस येथील युनेस्को (UNESCO) मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच बाबासाहेबांचा पुतळा स्थापित झाल्याने भारताने जागतिक पातळीवर नवा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक घटनेनंतर पॅरिस येथील भारताचे राजदूत व युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांनी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेच्या पॅरिसमधील मुख्यालयात आजवर अनेक जागतिक नेत्यांचा गौरव करण्यात आला आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही घटना केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगभरातील समता, मानवाधिकार आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीसाठी अभिमानास्पद मानली जात आहे.
वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; ‘स्वाधार’ योजनेला मुदतवाढ!
या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना राजदूत विशाल व्ही. शर्मा म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान, शिक्षणाचे महत्त्व, मानवाधिकार आणि सामाजिक समतेची मूल्ये ही जगाला अधिक व्यापकपणे परिचित करून देणे, हाच या पुतळा स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे.”
पॅरिसमधील यशस्वी कार्यक्रमानंतर भारतात परतल्यानंतर विशाल शर्मा यांनी चैत्यभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. “जागतिक स्तरावर बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पोहोचवण्याचे भाग्य लाभले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.






