ढाका : बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाने आता अत्यंत रौद्र आणि हिंसक रूप धारण केले आहे. आंदोलकांनी गुरुवारी राजधानी ढाका येथील दोन नामांकित वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ला करत इमारतीला आग लावली. या भीषण हिंसाचारात एका व्यक्तीला जमावाने झाडाला टांगून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, देश सध्या अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांचा म्होरक्या उस्मान हादी याच्यावर आठवड्याभरापूर्वी गोळीबार झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी पसरताच आंदोलक अधिक आक्रमक झाले आणि बांगलादेशभर हिंसक वणवा पेटला.
पत्रकारांची मृत्यूशी झुंज
आंदोलकांनी ‘द डेली स्टार’ या वृत्तपत्राच्या कार्यालयावर अचानक हल्ला चढवला. कार्यालयाबाहेर असलेल्या वाहनांना आग लावल्यानंतर जमावाने इमारतीत प्रवेश करून तोडफोड आणि जाळपोळ केली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, कार्यालयातील अनेक पत्रकार आणि कर्मचारी आतच अडकले होते. जीवाच्या भीतीने काही पत्रकार इमारतीच्या छतावर गेले. अखेर अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत शिडीच्या साहाय्याने या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
एकाची निर्घृण हत्या
बांगलादेशच्या हिंसाचाराच्या मानुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आंदोलक इतके संतप्त झाले होते की, त्यांनी एका व्यक्तीला पकडून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला झाडाला टांगून जिवंत पेटवून दिले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून बांगलादेश सरकारने तातडीने काही मोठे निर्णय घेतले. अफवा रोखण्यासाठी संपूर्ण देशातील मोबाईल इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालये आधीच बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ढाकासह सर्व प्रमुख शहरांमध्ये लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून दंगलग्रस्त भागात फ्लॅग मार्च काढला जात आहे.





