चंद्रपूर : महाराष्ट्राच्या मातीत राबणाऱ्या बळीराजाच्या नशिबी आलेले हे दुःख पाहून आज माणुसकीही ओशाळली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याला सावकारी कर्जाचा परतावा करण्यासाठी चक्क आपली किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कर्जाचा असाही ‘फास’ : १ लाखाचे झाले ७४ लाख!
मिंथुर येथील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांच्याकडे ४ एकर शेती आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतून उत्पन्न मिळेनासे झाले, तेव्हा त्यांनी दुग्ध व्यवसायाचा आधार घेण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० – ५० हजार कर्ज घेतले. मात्र, दुर्दैवाने विकत घेतलेल्या गाईंचा मृत्यू झाला त्यात शेतीही पिकेना. कर्जाचा डोंगर वाढत गेला. आणि रोशन कुडे यांच्या संकटात भर पडली.
कडवट वास्तव हे की, या १ लाख रुपयांवर दिवसाला १० हजार रुपये या दराने अवाजवी व्याज आकारण्यात आले. बघता बघता हे कर्ज ७४ लाखांच्या घरात गेले. सावकारांच्या सततच्या जाचामुळे कुडे यांनी आपली २ एकर जमीन, ट्रॅक्टर आणि घरातील वस्तू विकल्या तरीही कर्ज फेडता आले नाही. कंबोडियामध्ये शस्त्रक्रिया अन् किडनीची विक्रीजेव्हा विकण्यासारखे काहीच उरले नाही, तेव्हा सावकाराने अत्यंत क्रूर सल्ला दिला. एजंटने यांना किडनी विकण्याचा सल्ला दिला. कुडे यांना कोलकाता येथे नेण्यात आले. तिथून त्यांना कंबोडिया येथे नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
आपली एक किडनी केवळ ८ लाख रुपयांना विकून त्यांनी सावकाराचे काही देणे पूर्ण केले. मात्र, आजही त्यांचे पूर्ण कर्ज फिटलेले नाही.
पोलीस प्रशासन आणि सरकार सुस्त?
अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी रोशन कुडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली, तक्रार दिली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सावकारांच्या दहशतीपुढे प्रशासन हतबल झाले आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
“मी माझे सर्वस्व गमावले आहे. किडनी विकूनही सावकाराचा तगादा थांबलेला नाही. जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करेन,” असा टाहो रोशन कुडे यांनी फोडला आहे.






