हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाला केवळ काही तास शिल्लक असताना, हिंगोली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या महाराष्ट्रात निवडणुकीमुळे सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा मत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर केला जात आहे.
मंगळवारी (२ डिसेंबर) होणाऱ्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हिंगोली पोलिसांनी शेतकरी भवन परिसरात मोठी कारवाई केली आहे. यामुळे हिंगोली शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या भरारी पथकाने टाटा नेक्सन कारमधून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. नोटांच्या बंडलांमध्ये १००, २००, ५०० आणि ५० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.
निवडणूक विभागाने मतदानापूर्वी प्रचाराचा वाढीव वेळ दिल्याने पोलीस आणि भरारी पथके शहरात अधिक सतर्क झाली होती. तपासणीदरम्यान ही मोठी रक्कम हाती लागली.
व्यापाऱ्याचा दावा, चौकशी सुरूजप्त केलेली ही रक्कम एका खासगी व्यापाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. संबंधित व्यक्तीने रक्कम बाळगण्याची परवानगी असल्याचा दावा केला आहे.
मात्र, निवडणूक विभागाने ही रोकड पडताळणी आणि प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे. कारमधील व्यक्तींकडून कागदपत्रांची तपासणी सुरू असून, रोकड मोजण्याचे आणि पुढील चौकशीचे काम निवडणूक विभागाचे अधिकारी करत आहेत. या कारवाईमुळे निवडणुकीच्या तोंडावर हिंगोलीतील राजकीय वातावरणात मोठी चर्चा रंगली आहे.






