अहमदनगर : संगमनेर नगरपालिकेची निवडणूक तब्बल 9 वर्षानंतर होत आहेत. वंचित बहुजन आघाडी संगमनेरमध्ये प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष व इतर समविचारी संस्था, संघटना यांनी संयुक्तपणे ” संगमनेर सेवा समिती” ची स्थापना केली आहे. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे हे या सेवा समितीच्या नेतृत्व करत आहेत.
संविधानवादी – समविचारी पक्षांसमवेत जाण्याचा राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र ध्यानी घेऊन शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर सेवा समिता समितीला पाठिंबा देण्याचे निश्चित केले. अनेक दिवस सातत्याने चर्चा केल्यानंतर प्रभाग क्रमांक 9 मधील दोन्ही उमेदवार अमजदखान उमरखान पठाण व विजया जयराम गुंजाळ हे वंचित बहुजन आघाडीच्या सहमतीने जाहीर केले आहेत.
महायुती – शिंदे सेनेचे आमदार अमोल खताळ यांनी शिवसेनेचे स्वतंत्र पॅनल उभे केले असून भाजप आणि राष्ट्रवादी शरद अजित पवार गट हेही स्वतंत्रपणे लढत असल्यामुळे महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे.
गेल्या वर्षापासून शहरातील कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न – सामाजिक सलोखा, अशा संवेदनशील वातावरणामध्ये सेक्युलर मतांची विभागणी होऊ नये; संगमनेर शहराच्या सर्वात्मक व सर्वसमावेशक विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर सेवा समिती सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संविधानाला केंद्रबिंदू मानत सर्व समाज घटकांना एकत्रितपणे विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी समविचारी पक्षांची एकजूट संगमनेर मध्ये प्रथमच झाली! संगमनेर 2.0 हे व्हिजन शहराच्या भौगोलिक – आर्थिक – शैक्षणिक – सामाजिक व सांस्कृतिक विकासाला चालना देणारे आहे.
या निवडणुकीमध्ये कुठल्याही सहभागी पक्षाचे चिन्ह न वापरता समितीच्या सर्व उमेदवारांना “सिंह” हे चिन्ह घेण्यात आले आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीची चांगली सुरुवात झाली; त्या अनुषंगाने समितीच्या सर्व उमेदवारांना बळ देण्याचे काम वंचितचे कार्यकर्ते करणार आहेत.





