मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे 25 नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संविधान सन्मान महासभेसाठी देशभर मोठ्या प्रमाणात नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. या महासभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि नियोजनासंबंधी मुंबईत आयोजित बैठकीत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत देशाला संविधान देण्यापूर्वी जे भाषण केले होते, त्यात बाबासाहेबांनी देशासमोरील धोके सांगितले होते. तेच धोके आता दिसून येत आहेत. संविधानावर उघडपणे हल्ले होत आहेत. हा धोका लक्षात घेत २५ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे, संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आली आहे.

या ऐतिहासिक महासभेची जय्यत तयारी सुरू आहे. मुंबई प्रदेश कमिटीच्या वतीने महासभेत देशभरातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागील संविधान सन्मान महासभा ही ऐतिहासिक ठरली होती. त्यापेक्षा जास्त संविधानवादी जनता या महासभेला येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व संविधानवादी जनतेला महासभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे झालेल्या या आढावा बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






