भिवंडी : वंचित बहुजन आघाडी (VBA) भिवंडी शहर शाखेतर्फे आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील नागरिक, बहुजन, आदिवासी, अल्पसंख्याक समाजातील तरुण, महिला आणि विविध विभागांतील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे भिवंडी शहर अध्यक्ष प्रदीप शिर्के होते. या पक्षप्रवेश सोहळ्याची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे भिवंडीतील अनेक प्रभागातून आलेल्या विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
यामध्ये रिपब्लिकन सेना मधील काही प्रमुख पदाधिकारी, काँग्रेसमधील कार्यकर्ते व विभागीय जबाबदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माजी पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या धोरणांवर विश्वास ठेवून प्रवेश घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे VBAचे भिवंडीतले संघटन आणखी मजबूत होऊन आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष अधिक प्रभावी शक्ती म्हणून उभा राहील, असा विश्वास पदाधिकारी यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी प्रमुख उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या भाषणात वंचित, बहुजन आणि सर्वसमावेशक राजकारणाची गरज अधोरेखित करत वंचित च्या संविधाननिष्ठ लढ्याला अधिक बळ देण्याचे आवाहन केले.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते रुपेशजी हुंबरे, नूर मोहम्मद खान, आकाश गायकवाड, भगवानजी बचुटे, उमेश घोडके, तानाजी अंदुरे, प्रल्हाद गायकवाड, मिरेश उजगरे, आशा पाटील यांसह इतर असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा भिवंडीतचा जनाधार अधिक मजबूत झाला आहे. विविध समाजघटकांतून पक्षाला मिळणारा पाठिंबा वाढत असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी शहरात आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावेल.





