अकोला : फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या (हत्या) प्रकरणाच्या अनुषंगाने, मुंबईतील वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या अपमानजनक वागणुकीचा निषेध करत, अकोला येथील वंचित बहुजन महिला आघाडीने अनोख्या पद्धतीने मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले.
साडीवर निषेधाचे निवेदन
यावेळी महिला आघाडीने साडीवर आपले निषेधपर निवेदन लिहून जिल्हाधिकारी साहेबांना सादर केले आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची खुर्ची खाली करण्याची मागणी केली. महिला आघाडीने स्पष्ट केले की, हा मोर्चा डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्ये संदर्भात रुपाली चाकणकर यांचा निषेध करण्यासाठी काढण्यात आला आहे.

मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांवरील अन्यायाचा तीव्र निषेध
मोर्चादरम्यान बोलताना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत निवेदन देण्यासाठी गेलेल्या त्यांच्या महिला भगिनी उत्कर्षा रूपवते आणि स्नेहल सोहनी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी दाखवलेला रोष, मारहाण आणि लोटबाजी याचा जाहीर निषेध केला.
“महिला असून महिलेला समजून घेण्याची मानसिकता नाही” – रुपाली चाकणकरांवर रोष
वंचित बहुजन महिला आघाडीने रुपाली चाकणकर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा रोष व्यक्त करताना महिला आघाडीने म्हटले –
“आमचा रोष असा आहे की त्या एक महिला असूनही त्या महिलांचं मत जाणून घेत नाहीत. त्यांच्यावर अन्याय झालेला असताना सुद्धा त्यांना अपशब्दांनी त्यांनी बोललेलं आहे. याच्यासाठी आमचा हा राग आहे की एक महिला असून एका महिलेला समजून घेण्याची त्यांची मानसिकता नाही. आणि ती मानसिकता नसल्यामुळे त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा थोडाही अधिकार नाही.”

गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना साडी कुरिअरने पाठवणार
महिला आघाडीने थेट गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असतानाही सरकार आणि गृह विभाग झोपेचं सोंग घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी, निषेध म्हणून ही साडी गृहमंत्र्या.. म्हणजेच मुख्यमंत्र्यांना कुरिअरने पाठवण्यात येणार आहे.
यासाठी, महिला आघाडीने ‘भीक मांगो आंदोलन’ करणाऱ्या सगळ्यांजवळून एक-एक रुपया जमा करून, ही निषेधपर साडी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे.






