फुले, शाहू आंबेडकरी विचारांची मशाल पेटती राहूद्या – जितरत्न पटाईत
पुणे : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने फुले, शाहू, आंबेडकराईट्स सोशल मीडिया अवेअरनेस ही विशेष प्रशिक्षण कार्यशाळा पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आधुनिक काळातील समाज परिवर्तनासाठी सोशल मीडिया हे प्रभावी साधन बनले असून, या माध्यमाचा वापर विचार प्रसारासाठी कसा करावा याबाबत राज्य प्रमुख (सोशल मीडिया) जितरत्न पटाईत यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पटाईत म्हणाले की, आजच्या काळात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर विचार प्रसाराचं रणांगण आहे. प्रत्येक पोस्ट, प्रत्येक व्हिडिओ आणि प्रत्येक कमेंट ही फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची नवी मशाल ठरू शकते. या मशालीचं उजेड कधीही मंद होऊ देऊ नका. कारण आजची एक प्रभावी पोस्ट उद्याचा एक जागरूक मतदार घडवू शकते. फुले–शाहू–आंबेडकरांचा विचार आणि प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व यांचा संदेश डिजिटल माध्यमातून घराघरात पोहोचवणं हीच खरी सामाजिक क्रांती आहे.

कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य प्रमुख (सोशल मीडिया) जितरत्न पटाईत आणि माजी प्रवक्ते (वंचित बहुजन आघाडी) संतोष संखद उपस्थित होते. तर यावेळी प्रबुद्ध भारतचे आकाश एडके यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. त्यांनी संविधानवादी आणि फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे कसा करता येईल, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
फुरसुंगी नगरपंचायतमध्ये वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न
कार्यशाळेत प्रशिक्षण, चर्चासत्रे आणि प्रत्यक्ष सोशल मीडिया सत्रे असे तीन टप्पे घेण्यात आले. कार्यकर्त्यांना पोस्ट डिझाईन, व्हिडिओ निर्मिती आणि डिजिटल कॅम्पेनिंग याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन सागर नामदेव आल्हाट (पुणे शहर अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी) यांनी केले, तर अध्यक्षस्थानी रक्षणीताई शेंडकर होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीकांत चौगुले यांनी केले.
पुणे शहरातील विविध प्रभागांमधून मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सोशल मीडिया टीम सदस्य उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये समाज माध्यमांवर संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची उर्मी निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





