अकोला : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कमिशनखोरी आणि भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने आज थेट आक्रमक पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांना निर्वाणीचा इशारा देत म्हटले की – “जिल्हा परिषदेच्या कामांमधील कमिशनखोरी आणि ठराविक कंत्राटदारांना प्राधान्य देणे हे त्वरित थांबवावे, अन्यथा कार्यकारी अभियंत्यास काळे फासून आंदोलन केले जाईल.”
भ्रष्टाचारावर पोलखोल –
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयात आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत कामवाटपातील भ्रष्टाचाराची संपूर्ण पोलखोल करण्यात आली.
राजेंद्र पातोडे यांनी सांगितले की, ४ नोव्हेंबर रोजी संविधान भवन येथे झालेल्या कामवाटप समितीच्या सभेत २२ कामांची किंमत फक्त ३३ लाख रुपये दाखवली गेली, परंतु प्रत्यक्षात ती कामे सुमारे ७ कोटी ७० लाख रुपयांच्या असल्याचे उघड झाले आहे. ही कामे छुप्या आणि बेकायदेशीर पद्धतीने ठराविक कंत्राटदारांना फायद्याचे होईल अशा रीतीने वाटप करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
आमदाराचे नाव घेऊन टेंडरमध्ये अडथळे
अकोट तालुक्यातील रामपूर (धारूळ), अकोलीजहान, तसेच तेल्हारा तालुक्यातील झरी बाजार, भिली, अडगाव बु. या ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या विकास कामांसाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दिले असूनही, कर्मचारी आणि अभियंते टेंडर बुक देण्यास टाळाटाळ करत आहेत. अगदी काही ठिकाणी आमदारांचे नाव सांगूनही प्रस्ताव रोखले जात आहेत, असा आरोप पातोडे यांनी केला. त्याच गावातील एका कामाचे टेंडर बुक एका ठेकेदाराला दिले गेले, तर दुसऱ्या कामासाठी सरपंचाला मुद्दाम अडवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना इशारा –
या सर्व प्रकाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तक्रार करण्यात आली असून, जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर वंचित बहुजन युवा आघाडी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पातोडे यांनी दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भ्रष्टाचार थांबला नाही, तर कार्यकारी अभियंता यांना काळे फासून निषेध केला जाईल.”
या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, माजी जि.प. सदस्य गोपाल कोल्हे, सचिन शिराळे, जय रामा तायडे, नागेश उमाळे, वैभव खडसे, सुगत डोंगरे, श्रीकृष्ण देवकुणबी, राजदर खान, अमोल डोंगरे, महेंद्र शिरसाट, अमोल वानखडे, अभी वानखडे, मयूर सपकाळ, रवी वानखडे, आकाश शेगोकार, विश्वजीत खंडारे, विजय पातोडे, विकी दांदळे, आकाश जंजाळ, सुरज दामोदर, आकाश गवई, रवि वानखडे यांसह वंचित बहुजन युवा आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






