पुणे : इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँण्ड अस्ट्रोफिजिक्स (आयुका), पुणेचे माजी संचालक आणि ख्यातनाम शास्त्रज्ञ प्रा. नरेश दधिच यांचं बीजिंग (चीन) येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञान, शिक्षण आणि समाजविचार क्षेत्राने एक सखोल विचारवंत गमावला आहे.
राजस्थानातील चुरु जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्या गावात शाळाही नव्हती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला. पुढे त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड सायन्स आणि नंतर पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलं. पुणे विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक, नंतर विभागप्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले.
प्रा. दधिच हे गुरुत्वाकर्षणाचा अभिजात सिद्धांत आणि क्वांटम सिद्धांत या विषयावर संशोधन करत असत. त्यांनी आयुका संस्थेच्या संकल्पनेत आणि स्थापनेत मोलाची भूमिका बजावली. डॉ. जयंत नारळीकर यांना आयुकाचे संचालकपद स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणारे तेच होते. चार्ल्स कोरिया यांच्या वास्तुशिल्प नेतृत्वाखाली आयुका संकुल उभारणीच्यावेळी दधिच यांचा सक्रिय सहभाग होता.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच प्रा. नरेश दधिच यांचा कल समाजकारण आणि साहित्यिक चिंतनाकडेही होता. युवक क्रांती दलाच्या स्थापनेच्या काळात ते सक्रिय सहभागी झाले.
दक्षिण आफ्रिकेत वैज्ञानिक म्हणून त्यांनी काही काळ कार्य केले आणि नेल्सन मंडेला यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीला ते विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंडेलांचे अनेक सहकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते.
आईनस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतासारख्या गुंतागुंतीच्या संकल्पना ते सोप्या, ग्रामीण दृष्टिकोनातून समजावून सांगण्याची अद्भुत हातोटी त्यांच्याकडे होती. विज्ञान आणि तत्वज्ञान यांचा समन्वय साधत त्यांनी भारतीय विचारविश्व समृद्ध केलं.
प्रा. दधिच यांनी Economic and Political Weekly मध्ये “Plurality of Indian Mind” हा निबंध लिहिला होता. त्यांचा विज्ञानावरील दृष्टिकोन आणि मानवतावादी विचारशैली यामुळे ते आशिष नंदी, जयंत नारळीकर, वसंत पळशीकर यांच्यासारख्या विचारवंतांमध्ये त्यांना मानाचे स्थान होते. त्यांच्या पत्नी साधना दधिच समाजवादी चळवळीत सक्रीय होत्या. त्यांना दोन अपत्ये – जुई आणि निशिथ अशी आहेत. त्यांच्या निधनामुळे वैज्ञानिक, समाजवादी आणि साहित्यिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.






